सुभाष कदम - चिपळूण -- सरकारी काम आणि सहा महिने थांब असे म्हटले जाते. परंतु, या उदासीनतेतून मार्गक्रमण करणारे काही अपवादात्मक कर्मचारीही असतात. आपले काम प्रामाणिकपणे करताना जनतेची सेवा करण्यासाठी ते झटत असतात. डुगवे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अभिजीत पोपट ढेंबरे यांनी केवळ २ महिन्यात ११ बायोगॅस बांधून आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. ग्रामीण भागात बायोगॅस बांधण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जातो. लाभार्थी शोधण्यापासून त्यांना विनवणी करुन बायोगॅस बांधण्यापर्यंतची प्रक्रिया अतिशय अवघड आणि कटकटीची असते. बायोगॅस का बांधावा? त्याचा उपयोग काय? आणि त्यातून फायदा कसा होतो हे गळी उतरविताना कसरत करावी लागते. चिपळूण तालुक्याला यावर्षी ३० बायोगॅस बांधण्याचे उद्दिष्ट आहे. वर्षअखेर होण्यास २ महिने बाकी आहेत. राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रमाअंतर्गत कृषी विभागातर्फे त्याची अंमलबजावणी सुरु आहे. यासाठी केंद्र शासन ९ हजार रुपये व बायोगॅसला शौचालय जोडल्यास १२०० रुपयांचे अनुदान असे मिळून १० हजार २०० रुपये लाभार्थीला दिले जातात. गाव पर्यावरण ग्राम समृद्धी योजनेत असेल तर ग्रामपंचायत काही निधी लाभार्थीला देऊ शकते. बीएस्स्सी अॅग्रीपर्यंत शिकलेले ढेंबरे १० वर्षांपूर्वी नारदखेरकी ग्रामपंचायतीत कार्यरत होते. त्यांच्याकडे काही काळ ओमळीचा अतिरिक्त कार्यभार होता. त्यानंतर त्यांची बदली देवखेरकी येथे झाली. देवखेरकीबरोबरच ताम्हणमळ्याचा अतिरिक्त भार त्यांच्याकडे होता. सध्या देवखेरकीबरोबर डुगवे व तुरंबव या दोन गावांचा अतिरिक्त भार त्यांच्याकडे आहे. त्यांच्या पत्नी रेश्मा थोरात-ढेंबरे याही रावळगाव व कात्रोळीच्या ग्रामसेविका आहेत. जे काम करायचे ते प्रामाणिकपणे करायचे. आपण शासनाचा पगार घेतो, त्यामुळे आपण जनतेचे सेवक आहोत. शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यासाठी ते सदैव कार्यरत असतात. कृषी विभागातर्फे कृषी अधिकारी विनोदकुमार शिंदे, सुनील खरात यांच्या मार्गदर्शनाखाली ढेंबरे यांनी देवखेरकी गावी ६, तर डुगवे गावी ५ असे ११ बायोगॅस उभारले आणि चार ते पाच बायोगॅस बांधण्याचा त्यांचा इरादा आहे. गटविकास अधिकारी गणेश पिंपळे व सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले यांचे आपल्याला कामात नेहमी मार्गदर्शन व सहकार्य मिळते. त्यामुळेच आपण ज्या गावात काम करतो त्या गावाला न्याय देता येते, असे ढेंबरे यांनी सांगितले. ढेंबरे यांच्या कामाची दखल घेऊन डुगवे ग्रामसभेने त्यांचे कौतुक केले. सरपंच विपलवी तांडकर, सर्व सदस्य, माजी सरपंच महेंद्र कदम यांनी ढेंबरे यांच्या कामामुळे गावच्या विकासाला गती मिळत असल्याचे सांगितले. प्रत्येक ग्रामसेवकाने असे आदर्शवत काम केले तर ग्रामीण भागाचा विकास दूर नाही, असेही ते म्हणाले.अभिजीत ढेंबरे यांनी केवळ दोन महिन्यात बायोगॅसचे पंचायत समितीचे ५० टक्के उद्दिष्ट एकट्याने पूर्ण केले. यातून त्यांच्या कामाची गती सहज लक्षात येते. गेले दोन महिने त्यांचं काम जवळून पाहतोय. गावातील प्रत्येक माणसाशी आपुलकीने आणि सौजन्याने वागून त्यांची कामे पूर्ण करण्यावर त्यांचा भर असतो. आजकाल ग्रामसेवक आपल्या कामापेक्षा इतर गोष्टीत अधिक लक्ष घालतात. अनेकवेळा गावाकडे फिरकतही नाहीत. असे असताना ढेंबरे यांचे काम वाखाणण्याजोगे आहे. त्यांचे कौतुक करायलाच हवे. त्यांच्यामुळे आमच्या गावच्या विकासाला निश्चितच गती मिळेल. - महेंद्र कदम, माजी सरपंच, डुगवेजिल्हाप्रमुख रिपब्लिकन सेना डुगवे ग्रामपंचायतीची प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा झाली. डुगवेची लोकसंख्या ५५४ आहे. येथे ५ वाड्या आहेत. या ५ वाड्यात सध्या ५ बायोगॅस झाले. ४ घरकुल, विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा होणार आहेत, तर एक वाचनालय बांधण्याचाही ग्रामस्थांचा मनोदय आहे. तसे ठराव मंजूर करण्यात आले आहेत.
ग्रामसेवकाने फक्त दोन महिन्यात बांधले तब्बल ११ बायोगॅस
By admin | Updated: January 29, 2015 23:39 IST