गुहागर : धोपावे येथील प्रसिध्द उद्योजक राजन दळी व रसिका दळी या दाम्पत्याने दिवाळी अभ्यंगस्नान साहित्य व विविध भेटवस्तंूच्या यशस्वी प्रयोगानंतर आता इको फ्रेंडली अत्याधुनिक गुढी तयार केली आहे. एवढेच नव्हे; तर ही गुढी सातासमुद्रापार पोहोचली आहे. कृपा औषधालयाचे राजन दळी यांच्या यशस्वी वाटचालीमध्ये पत्नी रसिका यांचाही सहभाग आहे. दळी यांच्या संकल्पनेतून विविध इको फ्रेंडली उपक्रम राबवण्यात येतात. ब्युटी पार्लरसाठी लागणाऱ्या साहित्याचे उत्पादन करण्यासाठीची प्राथमिक तयारी दिवाळीमध्ये सुरु असताना काही निवडक उद्योजकांना दिवाळी अभ्यंगस्नान साहित्य कल्पकतेने सजवून भेट देण्यात आले होते. या भेटवस्तूंना चांगला प्रतिसाद मिळाला. धकाधकीच्या जीवनात प्रत्येक सण साजरा करणे जमत नाही. यासाठीची सर्व तयारी प्रत्येक सणात वेगळ्या पद्धतीने करुन देण्याची संकल्पना बडोदा येथील डॉ. कुरुलकर यांनी सुचविली. गुढीपाडव्यासाठी सध्या बांबू मिळत नाहीत. ग्रामीण भागातही कमी अधिक फरकाने ही परिस्थिती आहे. शहरात तर हे अशक्यच असते. याचा सारासार विचार करुन दळी दाम्पत्याने फोल्डिंग गुढी बाजारात आणली आहे. याबाबत माहिती देताना रसिका दळी यांनी सांगितले की, ही गुढी चार फुटी असल्याने घरात किंवा गच्चीत उभारु शकतो. ही इको फ्रेंडली गुढी चार भागात फोल्ड होते. त्यासाठी लाकडाचा बेस आहे तोसुद्धा वेगळा होतो. जरीकाठाचा खण, त्यावर तांब्याचा कलश असून, ही गुढी वर्षानुवर्षे वापरता येऊ शकते. विशेषकरून शहरातून लोप पावणारी संस्कृ ती यामुळे जतन होणार आहे. या गुढीच्या तांब्याच्या कलशावरील आकर्षक सजावट काम स्थानिक मुली करतात. या गुढीबरोबर गुढी पाडव्याचे अध्यात्मिक व सर्व दृष्टीने किती महत्व आहे, या दिवसाला हिंदू वर्षाचा प्रथम दिन, हिंदू वर्षारंभ का म्हटले जाते, याचे माहिती पत्रकही देत असून, याचे पेटंटही घेणार असल्याचे रसिका दळी यांनी सांगितले. (प्रतिनिधी) सातासमुद्रापार इको गुढी प्रसिद्ध मराठी अभिनेता सुबोध भावे, रमेश भाटकर, वैभव मांगले, मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह साऊथ आफ्रिका, अॅटलांटा, दुबई, युएसए आदी परदेशासह देशातील विविध राज्यातील कृपा औषधालयाशी संबंधित प्रमुखांना कृ पा औषधालयातर्फे ही गुढी देण्यात आल्याने ही इको फें्रडली गुढी आता सातासमुद्रापार पोहोचली आहे.
धोपावेच्या दळी दाम्पत्याने बनवली इको फ्रेंडली गुढी
By admin | Updated: April 3, 2016 22:22 IST