रत्नागिरी : राजकीय गरमागरमी सुरू असतानाच आॅक्टोबरचा तडाखाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळेच दिवाळीचं अभ्यंगस्नान करताना अंगावर काटा उभा करणारी थंडी अनुभवाला येण्याऐवजी पहाटे घामाच्या धारांचा अनुभव येत होता. मंगळवारी ३६ अंशापर्यंत पोहोचलेले तापमान गुरूवारी ३३ अंशावर आले असून, ते पुढील तीन दिवस वाढणार नाही, अशी अपेक्षा आहे. नोव्हेंबरमध्येही तापमान ३0 अंशापेक्षा जास्तच राहील, असा अंदाज असल्याने आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया काहीशी उशिरा सुरू होण्याची भीती आहे. तसे झाले तर आंब्याला यंदाही नुकसानाच्याच वाटेवरून प्रवास करावा लागेल.आधी निवडणुका आणि मतमोजणीनंतर आता सत्ता स्थापनेवरून वणवा पेटला आहे. एका बाजूला ही राजकीय गरमागरमी असताना दुसऱ्या बाजूला आॅक्टोबरचा तडाखाही चांगलाच जाणवत आहे.समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ६४ टक्क्यांपर्यंत असले तरी किमान तापमान २५ अंशांपर्यंत वाढले आहे. त्यामुळेच उष्मा अधिक तीव्रतेने जाणवू लागला आहे. १६, १७ आणि २१ आॅक्टोबरला रत्नागिरीत ३६ अंश इतक्या तापमानाची नोंद झाली होती. पावसाळ्यानंतरचे रत्नागिरीतील हे सर्वाधिक तापमान आहे. १८, १९ आणि २0 असे सलग तीन दिवस ३५ अंश इतके तापमान होते. मंगळवारी ३६ अंशांवर गेलेले तापमान बुधवारी तीन अंशांनी कमी झाले आहे. अर्थात किमान तापमान २२ ते २४ अंशांदरम्यानच असल्याने उष्म्याची झळ चांगलीच जाणवू लागली आहे.येणारे तीन दिवस तापमान ३३ अंशावर स्थिर राहील, असा अंदाज आहे. त्यानंतर ते २६ अंशांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. अर्थात परत नोव्हेंबरमध्ये ते ३0 अंशापेक्षा जास्तच राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने आपल्या संकेतस्थळावर पुढील काही दिवसात उष्मा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.कोकणातील हापूस हे मुख्य फळपीक. गेली काही वर्षे बेभरवशी हवामानामुळे आंबा बागायतदारांना मोठी झळ सोसावी लागली आहे. आंब्याचा सर्वात पहिला टप्पा म्हणजे मोहोराचा. थंडी जेवढी अधिक पडते, तेवढा मोहोर वाढतो. योग्य वेळेत थंडी कमी झाली तर मोहोराला फलधारणा होते आणि आंब्याची चांगली वाढ होते. ज्या-ज्या वर्षी किमान तापमान १७ ते १९ अंशांदरम्यान राहिले होते, त्या वर्षी हापूस चांगल्या प्रमाणात आला होता. मात्र, आताचे अंदाज पाहता नोव्हेंबरमध्येही कमाल तापमान ३0 अंशापेक्षा अधिक आणि किमान तापमान २१-२२ अंश इतके राहण्याचा अंदाज आहे. असे झाल्यास थंडी लांबेल आणि मोहोर येण्याची वेळही पुढे जाईल, अशी भीती आहे. (प्रतिनिधी)उन्हाळा लांबला तर साहजिक आंब्याला मोहोर येण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊन आंब्याचा हंगाम थोडा पुढे जातो, हा अनुभव याआधीही आला आहे. त्याचा प्रत्यक्ष पिकावर किती परिणाम होईल, हे मात्र आत्ताच सांगता येणार नाही.- उमेश लांजेकर,बागायतदार, रत्नागिरी
उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे आंब्याच्या नशिबी यंदाही धोकाच?
By admin | Updated: October 23, 2014 00:06 IST