चिपळूण : डॉ. राजाराम जगताप यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त सोमवारी शहरातील गोवळकोट येथील जिल्हा परिषद मराठी शाळा व बालवाडीतील विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. जगताप कुटुंबातर्फे या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.
मूळचे गोवळकोट येथील रहिवासी असलेल्या डॉ. राजाराम जगताप यांचे बाजारपेठेतील चिंचनाका येथे जगताप आरोग्यधाम अनेक वर्षे वैद्यकीय सेवेत कार्यरत होते. गोवळकोट येथे शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी डॉ. जगताप यांचे नेहमीच प्रयत्न असत. गोवळकोट येथील शाळेची नवीन इमारत उभारण्यासाठीही त्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, डॉक्टर जगताप यांचे २० सप्टेंबर २०२० रोजी निधन झाले आणि त्यांचा हा संकल्प अपुराच राहिला. त्यांच्या निधनाच्या घटनेला आज वर्षपूर्ती होत असतानाच, त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.
गोवळकोट जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांसह बालवाडीतील एकूण ४० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश, पुस्तके व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी श्रीदेवी करंजेश्वरी व श्रीदेव सोमेश्वर देवस्थानचे अध्यक्ष ॲड. प्रसाद चिपळूणकर यांनी डॉ. जगताप यांच्या दानशूर व्यक्तिमत्त्वाविषयी अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी पुष्पा जगताप यांनी, मराठी शाळेच्या इमारतीचे पूर्ण बांधकाम करून देण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. मेधा पेठे, डॉ. जगताप यांच्या कन्या डॉ. बेला पळणीटकर, तुषार रेडीज, शिक्षिका शीतल राजे आणि शिक्षक उपस्थित होते.