प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील कॉँग्रेस आघाडीचे वर्चस्व मोडीत काढत महायुतीने आपला झेंडा फडकावला. शिवसेनेचे विनायक राऊत तब्बल दीड लाखांच्या मताधिक्याने निवडून आले. गेल्या दोन विधानसभा निवडणुकात रत्नागिरी विधानसभेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असतानाही रत्नागिरीतच आघाडी ३१ हजारांपेक्षा अधिक मतांनी पिछाडीवर गेल्याने विद्यमान मंत्री उदय सामंत यांची या मतदारसंघातील हॅट्ट्रिक सोपी नाही, हे स्पष्ट झाले आहे. २००४ व २००९च्या रत्नागिरी विधानसभा निवडणुकीत दोन्हीवेळी राष्ट्रवादीचे तरूण उमेदवार उदय सामंत यांनी करिश्मा दाखवित विजय संपादन केला. आमदारकीच्या दुसऱ्या कार्यकालात शेवटच्या टप्प्यात त्यांना नगरविकाससह १० खात्यांचे राज्यमंत्रीपद मिळाले. रत्नागिरी मतदारसंघात शिवसेनेच्या एका गटाने मागच्या दोन्ही निवडणुकांच्या वेळी केलेल्या बंडखोरीमुळे सामंत यांचा विजय झाला, अशी निष्ठावंत शिवसैनिकांची व भाजपच्या कार्यकर्त्यांचीही भावना बनली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सेनेंतर्गत गटाला विनायक राऊत व सेनेच्या वरिष्ठांनी स्थानिक पातळीवरच पक्षाच्या नियमांमध्ये जखडून ठेवत कारवाईचा इशारा दिल्याने यावेळी मतांची फाटाफूट झाली नाही. त्यामुळेच विनायक राऊत यांना रत्नागिरी मतदारसंघात ३१५६५ एवढे मताधिक्य मिळाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे सुरेश प्रभू ५००० मतांनी पिछाडीवर होते. कॉँग्रेसच्या नीलेश राणेंना या मतदारसंघात ५ हजारांचे मताधिक्य होते. यावेळच्या राऊत यांच्या मताधिक्याचा विचार केला, तर २००९मधील ५ हजार मतांची पिछाडी तोडून ३१५६५ चे मताधिक्य त्यांना मिळाले. लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून किमान ५ ते १० हजारांचे मताधिक्य मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे निवडणुकीआधी पालकमंत्री सामंत यांनी जाहीर केले होते. मात्र, मताधिक्य तर नाहीच उलट राणे यांना ३१ हजार मतांचा घाटाच झाला. त्यामुळे कॉँग्रेसमध्येही राष्ट्रवादीबाबत नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे आमदारकीची हॅट्ट्रिक करण्यासाठी सामंत यांना काँग्रेसचे कितपत सहकार्य मिळेल, याबाबतही शंका आहे. एकिकडे महायुती मतदारसंघात मजबूत असताना राष्ट्रवादीतही अनेक गटातटाचे राजकारण आहे. सन २००४च्या निवडणुकीत सामंत यांना साथ देणारे कुमार शेट्ये, बाबू पाटील यांच्यासारखे रत्नागिरी तालुक्यातील महत्त्वाचे अनेक मोहरे आज त्यांची साथ सोडून गेले आहेत. या बाजू लक्षात घेता, विधानसभेचा पेपर सामंत यांच्यासाठी थोडा अवघडच आहे. अर्थात मतदारसंघात कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून विकासकामांना गती दिल्याने थेट कार्यकर्त्यांशी असलेले संबंध हे सामंत यांच्यासाठी निश्चित जमेची बाजू आहे. दुसरीकडे बाळ माने हे गेल्या दहा वर्षांच्या काळात या-ना त्या कारणाने सातत्याचे प्रकाशझोतात आहेत. आमदार नसले तरी त्यांच्या घरी रोजच जनता दरबार भरतो. लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे मताधिक्य विधानसभेतही राखण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू आहेत.
पालकमंत्रीपद असूनही सामंत यांना पेपर कठीणच!
By admin | Updated: June 10, 2014 01:26 IST