गुहागर : गेल्या अनेक वर्षांपासून पडवे ग्रामस्थांची पाण्यासाठी सुरु असलेली वणवण, मैलोनमैलांची पायपीट अजूनही संपण्याचे चिन्ह नाही. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत जीवन प्राधिकरणाची १ कोटी ८७ लाख २९ हजार २०० रुपये अंदाजीत रकमेची नळपाणी योजना मंजूर होऊनही पडवेवासियांची पाण्यासाठी दाहीदिशा वणवण सुरुच आहे.गुहागर तालुक्याच्या दक्षिण टोकाला जयगड खाडीकिनारी वसलेल्या पडवे गावची भौगोलिक स्थिती अतिशय प्रतिकूल अशी आहे. खाडी किनाऱ्याच्या तीव्र डोंगर उतारावर पडवे गाव वसलेले आहे. त्यामुळे गावातून दळणवळणाचा रस्ता, पाणी या वर्षानुवर्षाच्या समस्या आजही कायम आहेत. पडवे गाव भंडारवाडा, वरचा मोहल्ला, मधला मोहल्ला व खालचा मोहल्ला अशा चार भागात विभागले असले तरी या डोंगर उतारावरच दाटीवाटीची लोकवस्ती आहे. गावची लोकसंख्या आज तीन हजाराहून अधिक आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणखीनच गंभीर बनत चालला आहे.पडवे गावच्या महिला वर्षानुवर्षे सोमनाथ नदी या सुमारे ४ कि. मी. अंतरावरील पाणवठ्यावरुन डोंगरदऱ्यांमधून पायपीट करत पीणी भरत आहेत. उन्हाळ्यात नदीचे पात्र पूर्णपणे सुकून जाते. यावेळी नदीपात्रात खड्डा करुन वाटी किंवा पेल्याने हंडा भरावा लागतो. याच सोमनाथ नदी पात्रात विहीर खोदून गावाला नळपाणी योजना सुरु करण्यात आली. मात्र फेब्रुवारी महिन्यापर्यंत वर्षभर एक दिवसाआड पाणी मिळते. त्यानंतर दोन दिवसाआड, तीन दिवसआड असा कालावधी वाढत जातो. एप्रिल, मे महिने तर अगदी दुष्काळाचेच जातात.यावेळी शासनाचा टँकर जरी मिळाला तरी मोठ्या लोकसंख्येमुळे पाणी वाटप शक्य होत नाही. आजही महिला पाण्यासाठी चार किलोमीटरची जीवघेणी पायपीट करताना दिसतात. ज्यांना शक्य आहे ते एकत्रित मिळून पाण्याचा टँकर आणतात.पडवे स्टॉपवरुन पाईप टाकून गॅलन भरले जातात. १०० रुपये प्रती गॅलन पाणी घेऊन तहान भागविली जाते. काळ बदलला, नवनवीन तंत्र बदलले मात्र पडवेवासियांची पाण्यासाठीची वणवण मात्र अद्यापही थांबलेली नाही. ही पायपीट केव्हा थांबेल ही ग्रामस्थांची प्रतीक्षा कायमच आहे. (वार्ताहर)नव्या पाणी योजनेची आस --पडवे गावासाठी पावणेदोन कोटी रुपये अंदाजीत खर्चाची नवीन नळपाणी योजना मंजूर झाली आहे. योजनेसाठी सोमेश्वर नदीपात्रात नवीन विहिर खोदण्यात येणार आहे. नव्या योजनेतून ग्रामस्थांना वर्षभर पाणीपुरवठा होऊ शकणार असल्याने या योजनेची प्रतीक्षा आहे. ही योजना पूर्णत्वास गेली की येथील ग्रामस्थांना मैलोन मैल करावी लागणारी प्रतीक्षा संपणार आहे.पायपीट..चार किलोमीटर डोंगर दरीतून पायपीटविकतचे पाणी पावणे दोन कोटींची जीवन प्राधिकरणची योजना मंजूरपडवे गावाची भौगोलिक परिस्थिती प्रतिकूल असल्याने पाण्यासाठी पायपीट रस्ता, पाणी, वीज हे प्रश्न तसेच राहिल्याने विकास खुंटल्याची ग्रामस्थांची भावना
पडवेवासीयांची पाण्यासाठी वणवण
By admin | Updated: May 19, 2015 00:31 IST