लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील गुणवत्तेनुसार शिक्षकांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय विचाराधीन आहे. शिक्षक प्रशिक्षण प्रणाली तयार करण्याच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. वास्तविक ‘डायट’सारखी संस्था असताना खासगी संस्थांच्या माध्यमातून मूल्यमापनाचा घाट सुरू आहे. यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रावस्था तर आहे, शिवाय शासनाच्या धोरणांबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
वास्तविक गतवर्षीपासून कोरोना संकटामुळे शाळा बंद आहेत. नोव्हेंबरमध्ये नववी ते बारावी तर जानेवारीत पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यात आले होते; मात्र पहिली ते चाैथीपर्यंत वर्गाचे ऑनलाइनच अध्यापन सुरू होते. कोरोना संकटामुळे पहिली ते अकरावीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्याप वेळापत्रक जाहीर केलेले नाही.
कोरोनामुळे वर्षभर मुले घरी आहेत. प्राथमिक शाळेचे अध्यापन तर वर्षभर ऑनलाइनच राहिले. वार्षिक परीक्षासुद्धा रद्द करण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या चाचणी किंवा परीक्षेतील गुणांवरून शिक्षकांचे मूल्यमापन करण्याबाबत विचार सुरू आहे. मूल्यमापनासाठी तर शिक्षक प्रशिक्षण प्रणालीची कोट्यवधी रुपयांची निविदाही काढण्यात आली आहे. शिक्षकांमध्ये याबाबत माहिती पसरली असून, परीक्षाच नाही तर मूल्यमापन कसे होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिक्षण विभागाने शिक्षकांच्या प्रशिक्षण व मूल्यांकनासाठी स्वतंत्र प्रणाली तयार करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी निविदाही मागविली आहे. शिक्षक, विद्यार्थी, शाळा यांची माहिती संकलित करणाऱ्या सरल प्रणालीतील माहितीशी ही नवी प्रणाली जोडली जाणार आहे. विद्यार्थी संख्या व त्यांचे गुण यांची नोंद नवीन प्रणालीत केली जाणार आहे. त्यानुसार त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन केले जाणार आहे. प्रशिक्षण प्रणालीत विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची यंत्रणा असावी, असे म्हटले आहे; मात्र हे धोरण चुकीचे असल्याचे सांगत शिक्षकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
----------------------
शासनाने गुणवत्तेचे निकष लावण्याचे निश्चित केले असले तरी, मात्र ते सर्व विभागांना असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरून शिक्षकांचे मूल्यमापन चुकीची संकल्पना असून, शासनाने या धोरणाबाबत पुन्हा विचार करावा.
- विजयकुमार रुग्गे, निवृत्त प्राचार्य.
--------------------
शिक्षकांचे मूल्यमापनच करायचे असेल तर केंद्रप्रमुखांपासून अगदी विस्तार संचालकांपर्यंत यंत्रणा आहे. त्यासाठी वेगळ्या यंत्रणेची आवश्यकता कशासाठी? दरवर्षी वार्षिक तपासणीतून मुलांसह शिक्षकांचेही मूल्यमापन होत असते. शासनाने विद्यार्थी गुणवत्तेनुसार मूल्यमापन वेगळ्या संस्थेमार्फत राबविण्याचे ठरविले तर त्याला कडाडून विरोध करणार.
- दीपक नागवेकर, जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ, रत्नागिरी.
----------------------
जिल्ह्यातील प्राथमिक शाळा २५७४
प्राथमिक शिक्षक ७०००
नगर परिषदेचे शिक्षक १५०