रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्यावाढीमुळे जिल्हा प्रशासनाने आठवडाभराचे कडकडीत लाॅकडाऊन करण्याचा निर्णय सोमवारी सायंकाळी जाहीर केला. आठवडाभराचे लाॅकडाऊन होणार असल्याने मंगळवारी सकाळी रत्नागिरी शहरातील बाजारात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. भाजीपाला, कांदा, किराणा खरेदीसाठी दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या.
जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून लाॅकडाऊनची घोषणा केली होती. सोशल मीडियाव्दारे रात्रीच वृत्त नागरिकांपर्यंत पोहोचले होते. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार सकाळी ७ ते ११ वेळेत जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी परवानगी असल्याने ग्राहकांनी सकाळपासूनच खरेदीसाठी गर्दी केली होती. धनजी नाका, माळनाका, मारुती मंदिर, कोकणनगर परिसरात भाजी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. मटण, चिकन विक्रेत्यांकडेही रांगा लागल्या होत्या. किराणा दुकानदारांसमाेर खरेदीसाठी ग्राहक रांगेत उभे होते. लाॅकडाऊनमध्ये घराबाहेर पडता येणार नाही; परंतु, गाड्यांमध्ये इंधन असावे यासाठी पेट्रोल, डिझेलसाठी पंपापासून रस्त्यापर्यंत रांगा लागल्या होत्या. कोरोना संसर्गाची भीती असतानाही गर्दीतून खरेदी सुरू होती.
सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, ११ वाजेनंतरही अनेक ठिकाणी विक्री सुरू होती. दुकानदार चार ग्राहकांना आत घेऊन शटर लावून किराणा विक्री करीत होते. त्यामुळे दिवसभर किराणा विक्री सुरू होती. आठवडाभरासाठी लागणारा भाजीपाला, फळे ग्राहकांनी खरेदी केल्यामुळे भाजी विक्रेत्यांकडील भाजीचीही हातोहात विक्री झाली. कांदा-बटाटा-लसूण विक्रेत्यांनी या संधीचा फायदा घेतला. दुचाकीवरून अनेक ग्राहक कांद्याचे पोते घरी घेऊन जात होते. प्रशासनाने दूध घरपोच विक्री करण्याची सूचना केली आहे. मात्र, तरीही मंगळवारी सकाळी दुधासाठी विशेष मागणी होती. अनेक ग्राहकांनी जास्त दूध, दही खरेदी केले.
-------------------
आक्षेपानंतर एक दिवस उशिराने लाॅकडाऊन
जिल्हा प्रशासनाने साेमवारी लाॅकडाऊन जाहीर करताच रत्नागिरी शहरातील व्यापारी महासंघाने त्याला विराेध केला. अर्धवट लाॅकडाऊन करण्याऐवजी पूर्ण लाॅकडाऊन करा, असा सूर आळवला. त्यानंतर मंगळवारी जिल्हा प्रशासन आणि व्यापाऱ्यांबरोबर बैठक झाली. या बैठकीनंतर २ जूनऐवजी ३ जूनपासून लाॅकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
----------------------------
कारवाई टाळली
बॅंकांमधील आर्थिक व्यवहारांसाठी बॅंकांबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे दुपारपर्यंत शहरातील वाहनांची वर्दळ सुरूच होती. वास्तविक लाॅकडाऊन सुरूच असल्याने शहराच्या प्रत्येक नाक्यावर पोलीस बंदोबस्तासाठी तैनात आहेत. मात्र, कडक लाॅकडाऊनमध्ये नागरिकांची गैरसोय होऊन नये यासाठी पोलिसांनी विशेष कारवाई टाळली.