सुभाष कदम - चिपळूण -विधानसभा मतदार संघात चिपळूण शहरामध्ये ३४ हजार ४०२ मतदान आहे. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शेखर निकम यांना ९ हजार ५२२ मते मिळाली, तर शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण यांना ८ हजार २३५ मते मिळाली. चव्हाण यांच्यापेक्षा निकम यांना केवळ १२८७ चे मताधिक्य शहरातून मिळाले. त्यामुळे शहरातून त्यांचा अपेक्षाभंग झाला. चिपळूण शहरात गोवळकोट ते बहादूरशेख नाका, पाग ते खेंड, उक्ताड असा विस्तार आहे. शहरात एकूण ३४ हजार ४०२ मतदार आहेत. विधानसभा निवडणुकीत २१ हजार ९८६ मतदारांनी आपला हक्क बजावला. या निवडणुकीत २३६ मतदारांनी नोटाचा वापर केला. आमदार सदानंद चव्हाण यांना ८ हजार २३५, भाजपचे माधव गवळी यांना २ हजार ७७२, राष्ट्रवादीचे शेखर निकम यांना ९ हजार ५२२, काँग्रेसच्या रश्मी कदम यांना ६१०, कुणबी आघाडीचे गोपिनाथ झेपले यांना ३१२, तर बहुजन समाज पार्टीचे पे्रमदास जाधव यांना १३२ मते मिळाली. काँग्रेस व कुणबी आघाडीच्या उमेदवाराने ९२२ मते घेतली. ही मते शेखर निकम यांचीच कमी झाली. चिपळूण शहरात अर्बन बँक, नगर परिषद व अनेक लहान मोठ्या संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. शहरासाठी पक्षाची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. शिवाय राष्ट्रवादीचे नगरसेवक, नगराध्यक्ष आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रमेश कदम हे गेली अनेक वर्षे शहराचे नेतृत्व करीत आहेत. त्यांनी शेखर निकम यांच्या प्रचाराची धुरा हाती घेतली होती. असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित मताधिक्य शहरातून मिळाले नाही. याची खंत उमेदवार निकम यांना व पक्षालाही लागून राहिली आहे. चिपळूण शहरातून किमान ३ हजारांचे मताधिक्य मिळणे अपेक्षित होते. परंतु, पक्षाचे स्वयंघोषित पुढारी आपला धंदा, व्यवसाय सांभाळून कोणी हाक मारायला आले, तरच प्रचाराला जाणार या भूमिकेने वागले. पक्षापेक्षा स्वविकासाकडे लक्ष केंद्रित केलेली ही मंडळी पक्षासाठी आजकाल कोणताही त्याग करायला तयार नाहीत किंवा काही वेळा कोणाची वाईटकी नको म्हणून शांतता बाळगणारे अधिक लोक आहेत. चिपळूण शहरात शिवसेनेचे केवळ ४ नगरसेवक आहेत. या चारही नगरसेवकांनी आपल्या पक्षाचे काम जीवतोड केले. एक एक मत त्यांनी मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी जिवाचा आटापिटा केला. शिवसेनेला सर्वांत जास्त मते शशिकांत मोदी नगरसेवक असलेल्या परशुरामनगर काविळतळी या भागात मिळाली आहेत. मोदी यांनी या भागात प्रत्येक मतदाराशी संपर्क साधला. डीबीजे महाविद्यालय मतदान केंद्र क्र. ६१ मध्ये शिवसेनेला ४१७, भाजपला १८४, तर राष्ट्रवादीला २३३ मते मिळाली. या भागात राष्ट्रवादीचे दोन, तर शिवसेनेचे दोन नगरसेवक आहेत. शिवसेनेला शहरातील जास्त लीड याच मतदान केंद्राने दिले. राष्ट्रवादीला बूथ क्र. ३१ गोवळकोट या प्रभागात ४७४ मते मिळाली, तर शिवसेनेला ३४ व भाजपला १५ मते मिळाली. राष्ट्रवादीला सर्वांत जास्त लिड या केंद्राने दिले. भाजपाला सर्वांत जास्त मताधिक्य बूथ क्र. ४७ पाग येथे २२१ भाजप, २१९ शिवसेना, तर १६६ राष्ट्रवादीला मते मिळाली. बूथ क्र.४० कन्याशाळा बापटआळी येथे भाजपला २१९, शिवसेनेला ३३०, तर राष्ट्रवादीला १६० मते मिळाली. एकूण शहराचा विचार करता लोकसभा निवडणुकीत येथे शिवसेना - भाजप युती होती व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी होती. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना माजी खासदार नीलेश राणे यांच्यापेक्षा २९०३ मतांचे मताधिक्य मिळाले होते. त्यावेळी मतदानही जास्त झाले होते. आता मतदान कमी झाले आहे. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असलेल्या या भागात सर्व नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी ताकद लावली असती तर शेखर निकम यांना अपेक्षित असणारे मताधिक्य मिळाले असते. त्यामुळे चिपळूण शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व नगरसेवकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. शेखर निकमसारखा चांगला उमेदवार सर्वच स्तरावर सक्षम असताना त्याचा फायदा येथील पदाधिकाऱ्यांना उठवता आला नाही, ही राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा आहे.इतर ‘फॅक्टर’ही लक्ष देण्याजोगे...शहरात काँग्रेसला ६१०, बसपाला १३२, कुणबी सेनेचे गोपीनाथ झेपले यांना ३१२, तर २३६ मते नोटाला गेली आहेत. याशिवाय रिपब्लिकन सेनेच्या उमेदवारांनीही येथे बऱ्यापैकी मते घेतली आहेत. याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. शेखर निकमचिपळूण शहरात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ नगरसेवक आहेत, तर राष्ट्रवादीला मानणाऱ्या शहर विकास आघाडीचे ५ नगरसेवक आहेत. १७ नगरसेवक असतानाही राष्ट्रवादीला येथे समाधानकारक यश मिळाले नाही. काँगे्रसचे ३, शिवसेनेचे ४ नगरसेवक आहेत.सदानंद चव्हाणभाजपला शहरात मिळाली अल्प मते.भाजपचा प्रभाव वाढविण्यावर भर देणार गवळी. भाजपला शहरावर लक्ष केंद्रीत करायला लावणारा निकाल. मतदार संघ बांधणीसाठीसाठी भाजपला मोठा वाव.माधव गवळी
चिपळूण शहराने केला अपेक्षाभंग---राजकीय विश्लेषण
By admin | Updated: October 20, 2014 22:32 IST