लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा कारभार गेल्या अडीच वर्षांपासून प्रभारीच्याच हातात असून, ‘प्रभारीची परंपरा’ आजमितीसही कायम आहे. येथील गटशिक्षणाधिकारीपदी श्रीधर शिगवण गेल्या अडीच वर्षापासून प्रभारी म्हणून काम पाहत आहेत; मात्र कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकाऱ्यांसाठी कुठल्याच प्रकारच्या हालचाली होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
तालुक्यात ३४५ प्राथमिक शाळा असून, ९०० हून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. या शाळांवर देखरेख ठेवून शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तालुका शिक्षण विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातात; मात्र येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांचा कारभार प्रभारींच्या हातात असल्याने काही वेळा धोरणात्मक निर्णय घेताना अडचणी उभ्या ठाकत आहेत. येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागात अनेक वर्षांपासून प्रभारीचा सिलसिला कायम होता. मंगला व्हावळ यांची कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारीपदी नियुक्ती झाल्याने शिक्षकांना दिलासा मिळाला होता. या कायमस्वरूपी नियुक्तीमुळे कामकाजालाही गती मिळालेली असतानाच तीन वर्षानंतर त्यांची अन्यत्र बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागी पुन्हा विजय बाईत यांच्याकडे प्रभारी गटशिक्षणाधिकारीपदाचा कार्यभार सोपवण्यात आला. त्यांनीही ३ वर्षाहून अधिक काळ प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणूनच कारभार हाकला. तालुका पंचायत समितीच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारीपदी श्रीधर शिगवण यांची नियुक्ती करण्यात आली.
तालुक्यात ३१५ शाळा असतानादेखील दैनंदिन कामकाजाला गती देऊन शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी चार खात्यांचाही कारभार प्रभारींकडेच ज्या पंचायत समितीतून तालुक्याच्या विकासाची सूत्रे फिरवली जातात त्याच पंचायत समितीत चार खात्यांचा भार प्रभारींकडेच सोपवण्यात आला आहे. पंचायत समितीच्या तालुका शिक्षण विभागासह जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, एकात्मिक बालविकास प्रकल्प, तालुका कृषी रोपवाटिका आदी खात्यांचा समावेश आहे. कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती होणे आवश्यक आहे; मात्र तालुका शिक्षण विभागाला कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून उदासिनता का दाखवली जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्हा शिक्षण विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे.
--