जाकादेवी : जाकादेवी परिसरात काजूबीचा दर वधारला असल्याचे चित्र आहे. यावर्षीचे आंबा, काजूचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. कमी उत्पादनामुळे बाजारात सुक्या काजूबीला ८० ते ९० रुपये किलोला दर मिळत आहे.सुमारे २५ वर्षांपूर्वी हा दर २.५० पैसे असा होता, असेही एका व्यावसायिकाने सांगितले. छोटे मोठे व्यावसायिक ८० ते ९० रुपये किलोने काजूबी घेऊन ९५ रुपये किलो दराने फॅक्टरीत घालतात. जाकादेवी परिसरात काजूबी खरेदीचे ८ ते ९ काटे आहेत. या काट्यांवर परिसरातील किरकोळ काजूबी विक्रेते बाजारपेठेत काजू घालायला पिशवी किंवा गोणता भरुन घेऊन जातात व विक्री करतात. छोटे -मोठे काजूबी खरेदी करणारे व्यावसायिक वाडीवस्त्यांवर फिरून काजूबी खरेदी करताना दिसतात. प्रत्यक्ष बागेत जाऊनही काजूबी खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्याचा हेलपाटा वाचतो. फिरत्या खरेदी व्यावसायिकांमध्ये स्थानिक व्यावसायिकांसह परप्रांतीय व्यावसायिकसुद्धा आहेत. जाताना ही मंडळी बेकरीचे पदार्थ खारी-बटर-टोस्ट घेऊन जातात. त्याच्या मोबदल्यात काजूबी खरेदी करुन आणतात. काही ठिकाणी बागेचे टेंडर काढून काजूबी खरेदी करण्याची पद्धत अवलंबिली जाते. ५० ते १०० पोती बियांचे टेंडर असते. खासगी कंपनी आणि खासगी वाहतुकीचा मालक हे टेंडर घेतात. जाकादेवी बाजारपेठ व आजूबाजूला ८ ते ९ काटे आहेत. हे वजन काटे ३ ते ५ किलोचे, तर १०० किलोचा स्प्रिंगचा ताण काटाही असतो. आज या काट्याची बाजार किंमत छोटे ५०० ते ६०० रुपयांपर्यंत असतो. याला हात काटा म्हणतात, तर मोठ्या काट्याची किंमत १२०० ते १५०० रुपयांपर्यंत असते.जाकादेवी येथे काजूबी खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय ३० वर्षापूर्वीपासून रंजना वाडकर करतात. त्यांनी खूप वर्षापूर्वी २.५० पैसे दराने काजू बी खरेदीचा व्यवसाय सुरु केला. परिसरातील काजू बी व्यावसायिक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. त्याचबरोबर लाखन वाडकर हे ही या व्यवसायात चांगला जम बसवून आहेत. छोट्या व्यवसायात महेश साळुंखे व बंधूचे नाव घेतले जाते.गेले दोन वर्षापासून जाकादेवी बाजारपेठेत स्वराज्य कॅश्यू नावाची मुकेश देसाई यांची काजू फॅक्टरी खरेदी विक्रीचा व्यवसाय करत आहे. त्यांचाही काजू बी खरेदीचा स्टॉल बाजारपेठेत आहे. धामणसे मासेबाव येथेही काजू फॅक्टरी आहेत. काजू प्रक्रिया मशीन दीड लाखापर्यंत किंमतीची आहेत. आधुनिक तंत्रज्ञान वापरलेली मशीन ५ लाखापर्यंत आहे असे सांगितले जाते.हे मशीन काजू प्रक्रियेसाठी १२ तास दिवसा किंवा रात्रभर सुरु ठेवले तर ५०० ते ६०० रुपये लाईट बिल येते, अशीही माहिती मिळाली. फॅक्टरीत सोलला गेलेलाही काजू ४ किलो बियातून १ किलो काजूगर देतो. यामध्ये चार प्रकार असून, खारा, मसाला, तुकडा आणि व्हाईट हे प्रकार असतात. आज बाजारात ६०० ते ७०० रुपये किलो दर आहे. फिरते छोटे व्यापारी बी खरेदी करुन आणताना दिसतात. रस्त्याची सोय असेल तेथे मोटरसायकल, अॅम्पो किंवा रिक्षातून पोती आणताना दिसतात. परप्रांतीय मंडळी एका दगडात दोन पक्षी मारतात, तसे काम करतात. बेकरी प्रॉडक्ट विकायचे येताना काजूबी घेऊन यायचे. अतिशय मेहनती असलेले हे लोक या व्यवसायात जम बसवून आहेत. हंगामातील या उत्पन्नाकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे. (वार्ताहर)व्यावसायिकांची धावपळकाजू बीचा हा व्यवसाय हंगामी असून मार्च-एप्रिल असे दोन महिनेच काजू बीची खरेदी-विक्री चालते. हे व्यावसायिक हंगामात काजू बी खरेदी करतात. त्यांचा साठा करतात व दर बघून आॅड सिझनला काजू बी विकतात. या व्यवसायातून छोट्या व्यावसायिकांना ५० ते ६० हजार रु. तर मोठ्या व्यावसायिकांना दीड ते दोन लाख रुपयेही मिळून जातात असे काहीजणांकडून सांगण्यात आले.
काजूला कोकणात यंदा मिळतोय समाधानकारक दर
By admin | Updated: April 4, 2015 00:10 IST