मेहरून नाकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू आहे. लाॅकडाऊन काळात एस.टी.ला परवानगी देण्यात आली असली तरी अत्यावश्यक सेवा म्हणून मोजक्याच फेऱ्या सुरू आहेत. मात्र, अनेक गाड्या जागेवरच उभ्या आहेत. बंद गाड्यांची झीज कमी होत असली तरी नादुरुस्त होण्याचा धोका अधिक आहे. रत्नागिरी विभागात मात्र याबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. दररोज गाड्यांचे इंजिन सुरू करून ठेवण्यात येत असून, गाड्या आगारात इकडून तिकडे फिरविण्यात येत असल्यामुळे बंद काळातही एस.टी बस सुस्थितीत आहेत.
वास्तविक मोजक्याच फेऱ्यांमुळे अनेक गाड्या एकाच जागेवर उभ्या केल्या तर बंद होण्याचा धोका अधिक आहे. मात्र, पुढील अनावश्यक खर्च व बंद गाड्यांमुळे नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढू शकते. हे टाळण्यासाठी विभागीय कार्यशाळेतील, आगारातील यांत्रिक कर्मचारी याबाबत विशेष दक्षता घेत आहेत. कोरोनामुळे उपस्थितीचे प्रमाण ५० टक्के ठेवण्यात येत असले तरी कार्यशाळेत दोन शिफ्टमध्ये यांत्रिक कर्मचारी काम करीत आहेत. २०२०-२१ या वर्षात निकष पूर्ण केलेल्या ६२ गाड्या भंगारात काढण्यात आल्या आहेत. फेऱ्याच बंद असल्यामुळे वाहनांची झीज कमी होत आहे. पावसाळ्यातील देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू आहे.
लाॅकडाऊनमुळे मोजक्या फेऱ्या सुरू असल्याने विभागीय कार्यशाळेत एका रांगेत लालपरी लावून ठेवण्यात आल्या आहेत.
लाॅकडाऊनमुळे मोजक्याच फेऱ्या सुरू असल्याने गाड्या जागेवर उभे राहण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आठवड्यात १० गाड्या धावत असतील तर पुढच्या दहा दिवसांनी दुसऱ्या दहा गाड्यांची निवड केली जाते. त्यामुळे दर दहा दिवसांनी तपासणी सुलभ होत आहे. गाड्यांच्या प्रत्येक भागाची तपासणी करून इंजिन, गीअर, क्लच, ॲक्सिलेटर, स्टिअरिंग, क्लच राॅड, जाॅइंट व्हीलची चाचणी घेण्यात येते.
गाड्या एकाच जागी लावण्यात आल्या असल्या तरी त्या बंद पडू नयेत यासाठी दररोज गाड्यांना स्टार्टर मारून किमान पाच मिनिटे इंजिन सुरू ठेवण्यात येते. इतकेच नव्हे तर वाहन एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात येते. अनेक वेळा आगार ते स्थानकापर्यंत रिकामी एस.टी फिरवली जाते. यातून गाडीचे इंजिन बाद होऊन पुढील खर्च कमी व्हावा, एवढाच उद्देश आहे.
पावसाळ्यात अनेक एस.टी.च्या गाड्या गळत असतात. मोडक्या खिडक्यामुळे पाणी आत येते. शिवाय वायफर नसल्यामुळे चालकाला पुढे दिसत नाही. याबाबत दक्षता घेत असताना एस.टी.च्या छताची दुरुस्ती करण्यात आली आहे. मोडक्या खिडक्या बदलण्याचे काम अद्याप सुरू आहे. याशिवाय पावसाचे पाणी काचेवरून बाजूला करण्यासाठी वायफर बसविले जात आहेत.
मध्यवर्ती कार्यालयाकडे साहित्याची मागणी केली जाते. त्यानुसार दरमहा आवश्यक असणारे स्पेअर पार्टस्, साहित्याची उपलब्धता होत आहे.
गतवर्षी टायरचा तुटवडा भासला होता. मात्र, आता प्रमाण सुधारले आहे. शासन अधिनियमांचे पालन करून एस.टी. बंद पडू नये, याची काळजी घेतली जात आहे.
- दिवाळीपासून पूर्ण क्षमतेने एस.टी. फेऱ्या सुरू झाल्या. मात्र, शाळा बंद असल्याने अनेक शालेय फेऱ्या बंद होत्या.
- मार्चमध्ये पुन्हा लाॅकडाऊन झाले. अत्यावश्यक सेवेंतर्गत एस.टी. सुरू असली तरी वर्षभरात तीन महिनेच गाड्या रस्त्यावर होत्या.
- गतवर्षी (२०२०) च्या मार्चपासून लाॅकडाऊन झाले. त्यामुळे एस.टी. जागेवर उभ्या राहण्याचे प्रमाण वाढले व झीज कमी झाली.
- २०१९-२० च्या तुलनेत २०२०-२१ या आर्थिक वर्षात विभागीय कार्यशाळेचा दुरुस्ती खर्च कमी झाला आहे.
दहा दिवस, त्रैमासिक व वर्षातून नियोजन करून देखभाल दुरुस्ती केली जात आहे. फेऱ्या बंद असल्यामुळे झीज कमी झाली असून गाड्या नादुरुस्तीचे प्रमाण कमी झाले आहे. योग्य नियोजनामुळे शक्य होत आहे.
- प्रमोद जगताप,
यंत्र चालन अभियंता.