मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी जनतेशी ऑनलाईन साधलेल्या संवादावेळी गाव कोरोनामुक्त करणारे हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, मोहोड तालुक्यातील (जि. सोलापूर) ऋतुराज देशमुख आणि कोमल करपे या तीन सरपंचांचे विशेष कौतुक केले. यापैकी पोपटराव पवार यांना ३६ वर्षांचा सरपंच पदाचा अनुभव आहे. हिवरेबाजारसारख्या रूक्ष भागाचे त्यांनी नंदनवन केले आहे. त्यामुळे त्यांनी गावाला कोरोनामुक्त ठेवले, हे त्यांच्या एवढ्या वर्षांच्या अनुभवातून त्यांनी यशस्वी करून दाखविले आहे. मात्र, ऋतुराज देशमुख आणि कोमल करपे यांच्यासारख्या अननुभवी असलेल्या सरपंचांनी कोरोनाचे संकट गावाबाहेर फेकल्याने त्यांचे विशेष कौतुक करायला हवे. म्हणूनच अनेक चांगल्या गोष्टींसाठी विरोध करणाऱ्या गावांनी या सरपंचांचे कार्य लक्षात घ्यावे.
सरपंच हा गावाचा राजा असतो. त्यामुळे आपल्या रयतेचे हित, कल्याण सांभाळणे, ही त्याची जबाबदारी असते. त्यादृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यासाठी त्याने तत्परतेने पुढे यायला हवे. पहिल्या लाटेतील कोरोनाची परिस्थिती हाताळताना कशा तऱ्हेने हाताळायला हवी, हे प्रशासकीय, आरोग्य यंत्रणेलाही माहीत नव्हते. तरीही पहिल्या लाटेत अनेक गावांनी बाहेरून येणाऱ्या गाववाल्यांच्या विलगीकरणाची चोख व्यवस्था करीत कोरोनावर मात केली आणि त्याला वेशीबाहेरच टांगला. त्यामुळे अनेक गाव कोरोनामुक्त राहिले. यात ग्राम कृती दलाचे योगदान महत्त्वाचे होते.
मात्र, काेरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी ही गावे अयशस्वी का झाली, याचे आत्मपरीक्षण गावांनी करायला हवे. ज्या गावांनी खबरदारी घेतली, त्या गावांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आहे. मात्र, ज्या गावांमध्ये बेफिकिरी वाढली, त्या गावांमध्ये कोरोना रुग्णसंख्या आटोक्याबाहेर गेली आहे. या लाटेत काही तालुक्यांमध्ये गावेच्या गावे कोरोनाबाधित झाली. यावेळी ग्राम कृती दलाची भूमिका महत्त्वाची असूनही काही गावांमधील कृती दले उदासीन राहिली. गावांमध्ये येणाऱ्यांसाठी कुठलेच धरबंद राहिले नाहीत. त्यामुळे बाहेरून आलेल्यांनी घरातील ज्येष्ठ आणि मुलांना बाधित केले. महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्या लाटेत लक्षणे नसलेले तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या अधिक होते. हे रुग्ण घरीच उपचार घेत असताना त्यासोबत घरीच थांबण्याचे पथ्य पाळायचे असते, हेही विसरले. त्यामुळे यांनी अनेकांना प्रसाद दिला. त्यामुळे या दोन महिन्यांतील रुग्णसंख्या गेल्या वर्षभरापेक्षाही दुप्पट झाली.
तसे पाहिले तर पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे. निदान आता तरी प्रत्येक ग्राम कृती दलाने सतर्क राहायला हवे. ग्रामस्थांसाठी काही निर्बंध घालून देतानाच गावातील रुग्णांच्या अलगीकरण, विलगीकरण या दृष्टीनेही योग्य नियोजन केले तर गाव नक्कीच कोरोनामुक्त होईल. पोपटराव पवार, ऋतुराज देशमुख आणि कोमल करपे या सरपंचांनी केले ते आपल्याही सरपंचांना शक्य आहे. मात्र, इच्छाशक्ती हवी.