कोकण रेल्वे मार्गावर तर सध्या दिवसाला ५० गाड्या धावत असून, गणेशोत्सवासाठी ६ सप्टेंबरपासून २५ सप्टेंबरपर्यंत विशेष २६४ गाड्या फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. दिवा-सावंतवाडी व दादर - रत्नागिरी या दोन पॅसेंजर आरक्षित गाड्या सुरू केल्या आहेत. या दोन्ही गाड्यांना सर्व स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्या आरक्षित असल्याने डब्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होत नाही. मांडवी, कोकणकन्या स्पेशल गाड्यांना जानेवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. रत्नागिरी विभागाने या वर्षी प्रवाशांच्या मागणीनुसार त्यांच्या गावी एस.टी.ची उपलब्धता केली होती. त्यानुसार २५० गाड्या गावातील मुंबईकरांसाठी सोडण्यात आल्या. एस.टी.च्या या उपक्रमामुळे मुंबईकरांची गैरसोय दूर झाली. एकूणच प्रशासनाने निर्बंध शिथिल केल्यामुळे मुंबईकरांना येण्याचा मार्ग सुकर झाला. परिणामी, कोरोनाचे सावट असतानाही, गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यामुळे कोकण रेल्वे असो वा एस.टी. महामंडळालाही बाप्पा पावला आहे. एस.टी. व कोकण रेल्वेने जादा गाड्या सोडल्यामुळे मुंबईकरांची गैरसोय दूर झाली; शिवाय दोन्ही महामंडळांच्या उत्पन्नात भर पडली आहे. खासगी ट्रॅव्हल्सधारकांनाही गणेशोत्सवातील दिवसही उत्पन्न देणारे ठरले आहेत.
गणेशोत्सवासाठी लाखो मुंबईकर गावी आले असताना ५६ हजार मुंबईकरांच्या कोरोना चाचणीत ३५ जण बाधित सापडले आहेत. कोरोना संक्रमणाचे प्रमाण कमी झाले असून, ही एक जमेची बाजू आहे. वास्तविक, उत्सव काळात जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य यंत्रणेवर ताण अधिक होता. असे असतानाही उत्सव शांततेत साजरा करून मुंबईकर परतले आहेत. सध्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या शंभराच्या आत असल्याने जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. कोरोना आकडेवारी हळूहळू खाली येत शून्यावर येऊन जिल्हा कोरोनामुक्त व्हावा, अशी प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे. परंतु तिसऱ्या लाटेचा धोका असल्याची शक्यता वर्तविली जात असल्याने प्रत्येकाच्याच मनात धाकधूक आहे. मात्र बाप्पाला निरोप देताना प्रत्येक भाविकाने ‘कोरोना’ विघ्न सरण्यासाठी साकडे घातले असून, लवकरच जिल्हा कोरोनामुक्त व्हावा अशीच सर्वांची अपेक्षा आहे.