शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

बाप्पा येताय... लगबग वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:30 IST

कोकणात घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होणार असल्याने घरोघरी उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. गतवर्षीपासून कोरोनाचे सावट असल्याने उत्सव ...

कोकणात घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होणार असल्याने घरोघरी उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. गतवर्षीपासून कोरोनाचे सावट असल्याने उत्सव शासकीय निर्बंधात साजरा करण्यात येत आहे.

शासनाने सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. शिवाय गणेशमूर्ती उंचीवरही निर्बंध घातले आहे. घरगुती गणेशोत्सवासाठी किमान दोन फूट तर सार्वजनिक गणेशोत्सवासाठी किमान चार फूट उंचीची अट घालण्यात आली आहे. त्यानुसारच गणेशमूर्ती कार्यशाळेत मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. सध्या मूर्तीच्या रंगरंगोटीचे काम मात्र जोरात सुरू झाले आहे.

श्री गणेशाची विविध नावे आहेत, त्याप्रमाणे भक्त विविध रूपात गणेशमूर्ती तयार करण्याची विनंती मूर्तिकारांना केली जाते. बालगणेश तर सर्वांनाच भावतात. शिवाय विविध देवतांच्या रूपातीलही गणेशमूर्ती साकारण्यात येतात. मातापार्वतीसह बालगणेश मूर्तीला तर प्राधान्याने मागणी असते. गणेशमूर्ती तयार करायची म्हटली की, प्रामुख्याने शाडूमाती, प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती घडविण्यात येतात. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती लवकर विरघळत नाही, शिवाय प्रदूषण होत असल्याचे सांगण्यात येते. म्हणून आता न्यायालयाने त्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे कोकणातील काही मूर्तिकारांनी शाडूबरोबरच लालमातीपासून गणेशमूर्ती तयार केल्या आहेत.

रत्नागिरी शहरातील आशुतोष कोतवडेकर यांच्या कारखान्यात तर गेल्या दहा -बारा वर्षांपासून लालमातीपासून गणेशमूर्ती तयार केल्या जात आहेत. वास्तविक शाडूमातीचे ५० किलोचे पोते ३५० रुपये किलो दराने विकण्यात येते. लालमाती वाटूळ येथून खरेदी करून आणण्यात येते. दोन्ही मातीचे दर सारखेच आहेत; परंतु मातीतील काही गुणधर्म वेगळे आहेत. शाडूमातीपेक्षा लालमाती मळायला सोपी आहे. मूर्ती लवकर तयार होते. शिवाय मूर्तीची फिनिशिंग करणे सोपे होते, वाळतेही लवकर. त्यामुळे आशुतोष कोतवडेकर यांचे वडील कै. सुशील कोतवडेकर यांनी बारा वर्षांपूर्वी लालमातीतून गणेशमूर्ती तयार केली. त्यानंतर त्यांनी या शाडूबरोबर लालमातीतील गणपती तयार करण्यास प्रारंभ केला. रंगरंगोटीनंतर सुबक, रेखीव गणेशमूर्ती लालमातीतील आहेत की, शाडू मातीच्या भाविकांनाही ओळखता येत नाहीत. सध्या कोतवडेकर यांच्या कारखान्यात २५०० गणेशमूर्ती लाल मातीपासून तयार करण्यात आल्या आहेत.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मूर्ती तयार करण्यासाठी माती भिजवली जाते. त्यानंतर दोन ते अडीच महिने कारखान्यात काम सुरू असते. साचाव्दारे मूर्ती तयार होत असली तरी रेखीव कामाला खूप वेळ लागतो. शिवाय मूर्ती वाळण्यासाठीही अवधी जातो. चतुर्थीच्या आधी महिनाभर रंगकाम सुरू करण्यात येते. मूर्तीचे डोळे, कान, याबरोबर वस्त्र, आभूषणे यांचे रंगकाम कलाकुसरीचा भाग आहे. हल्ली भाविकांना फेटा असलेले किंवा किरीट घातलेल्या गणेशमूर्तींची भुरळ आहे. त्यामुळे खरोखरचा फेटा घालणे किंवा हुबेहुब रंगविणे हेही कौशल्य म्हणावे लागेल. आभूषणाबरोबर पीतांबर, शेला रंगविताना तो अधिक उठून दिसावा यासाठी कुंदन, मोती, टिकल्या, खड्ड्यांचा वापर केला जात आहे. कोकणच्या लोकांचा मुंबईशी ओढा असल्याने मुंबईतील मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्तींचे आकर्षण आहे. त्यामुळे सोशल मीडियावर भावलेल्या मूर्ती तयार करण्याची गळ मूर्तिकारांना घातली जाते व त्यानुसार मूर्तिकार कौशल्याचा वापर करून सुंदर मूर्ती तयार करीत आहेत.

सध्या रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. दि. १० सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. अनेक भाविक एक दिवस आधीच गणेशमूर्ती घरी घेऊन जातात. त्यामुळे दि. ८ सप्टेंबरपर्यंत गणेशमूर्ती तयार करून ठेवाव्याच लागणार आहे. त्यामुळे त्या पध्दतीने कामाचे नियोजन सुरू असून, काही कारखान्यांतून रात्रपाळी करून मूर्ती साकारण्याचे काम सुरू आहे.

यावर्षी जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेला महापूर व पुराचे पाणी नागरी वस्तीत घुसून झालेल्या नुकसानातून गणेशमूर्ती शाळाही वाचल्या नाहीत. चिपळूण, खेड, राजापूर, रत्नागिरी तालुक्यातील पूरग्रस्त गावांतील मूर्तिकारांना महापुराचा फटका चांगलाच बसला. गेले दोन वर्षे कोरोना संकटाला सामोरे जात असताना लॉकडाऊनचा सामना करावा लागला. लॉकडाऊनमुळे राज्याच्या सीमा बंद असल्याने शाडूमातीची उपलब्धता वेळेवर होऊ शकली नाही. त्यातच महापुरामुळे केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले. पुरामुळे तयार मूर्तींचे नुकसान झाले. त्यामुळे या भागातील मूर्तिकारांना नव्याने गणेशमूर्ती रेखाटाव्या लागल्या. महिना, दीड महिन्यात गणेशमूर्ती तयार करताना, मूर्तिकारांची दमछाक होत आहे; परंतु कोकणातील माणसांच्या जिव्हाळ्याचा सण आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील मूर्तिकार जीव ओतून श्री गणेशमूर्ती तयार करीत आहेत. मूर्ती वाळविण्यासाठी प्रखर विजेचे दिवे कारखान्यात लावून ठेवण्यात येत आहे. मात्र जिद्दीने वेळेवर गणेशमूर्ती तयार करण्यासाठी धडधड सुरू आहे.