रत्नागिरी : जिल्ह्यात खरीप हंगामाला प्रारंभ झाला असून, शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. कृषी विभागाकडून जिल्ह्यासाठी १३ हजार २७० मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली होती. आतापर्यंत १० हजार ७२८ मेट्रिक टन खताची उपलब्धता झाली आहे. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर खत उपलब्ध करून देण्यात आले असल्याने यावर्षी शेतकऱ्यांची गैरसोय झालेली नाही.
जून, जुलैमध्ये जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा शेतीची कामे पूर्ण करण्याकडे कल राहतो. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना वेळीच खत उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने नियोजन केले होते. जिल्ह्यासाठी १३,२७० मेट्रिक टन खतसाठा मंजूर करण्यात आला होता. खत साठ्याच्या मागणीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात साडेसहा हजार मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध झाला. त्यानंतर युरिया, सुफला इतर संयुक्त खतांचाही साठा शासनाकडून उपलब्ध झाला होता. टप्प्याटप्प्याने दहा हजार ७२८ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे.
आतापर्यंत युरिया खत ७,२२७ मेट्रिक टन व सुफला, १९:१९:१९, १८:१८:१० इतर संयुक्त खते ३,५१९ मेट्रिक टन उपलब्ध झाली आहेत. शेतकऱ्यांना वेळेअगोदरच साडेचार हजार मेट्रिक टन खत शासनाकडून उपलब्ध झाले आहे.
जिल्ह्यातील २३६ खत विकी केंद्र व विविध सहकारी सोसायट्यांकडे खत वितरीत झाले आहे. लवकरच उर्वरित खतसाठाही उपलब्ध होणार आहे. कृषी विभागातर्फे जिल्हा, तालुकास्तरावर भरारी पथके व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याठिकाणी आतापर्यंत एकही शेतकऱ्यांकडून खत उपलब्धतेबाबत तक्रार आलेली नाही. हा कक्ष दररोज सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
मान्सूनपूर्व पावसावर पेरण्या आटोपल्याने पोषक हवामानामुळे रोपांची वाढ जोमदार झाली असल्याने जिल्ह्यात भात लागवडीची कामे वेगात सुरू आहेत. खताची उपलब्धता वेळेवर झाल्याने लागवडीच्या कामामध्ये व्यत्यय आला नसल्याने शेतकरी समाधानी आहेत.
--------------------
जिल्ह्यासाठी १३,२७० मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी १० हजार ७२८ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. उर्वरित खतसाठा लवकरच उपलब्ध होणार आहे. तालुकास्तरावर गुणनियंत्रण कामासाठी तसेच कृषी निविष्ठांच्या तक्रारीबाबत धडक मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप एकही तक्रार शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेली नाही.
- अजय शेंडे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.