आबलोली : कोरोना आपत्तीच्या काळात सर्व जनजीवन टाळेबंदीत असताना कोविड योद्ध्यांनी आपल्या कुटुंबाची व स्वतःची पर्वा न करता कोरोना प्रतिबंध, जनजागृती, विलगीकरण आदी कामांमध्ये झोकून देऊन काम केले. त्यांचे योगदान सर्व समाजघटकांसाठी प्रेरणादायी असून, कोविड योद्धे हे समाजासाठी खऱ्या अर्थाने देवदूत आहेत, असे गौरवोद्गार कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष महेश नाटेकर यांनी काढले.
कोळवली (ता. गुहागर) प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे कोरोना आपत्तीच्या काळात योगदान देणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक, माध्यम प्रतिनिधी यांना ‘कोविड योद्धा’ सन्मानाने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधिकारी डॉ. घनश्याम जांगिड यांनी केले. प्रत्यक्ष तळागाळात जाऊन सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचून कार्य करणाऱ्या आपल्या सहकारी बांधवांचे त्यांनी कौतुक केले. या वेळी व्यासपीठावर पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. एल. चरके, आरोग्य विस्तार अधिकारी के. पी. सातपुते, रुग्ण कल्याण समिती सदस्य अनंत मोहिते, रवींद्र गावडे, उपसरपंच अजित भुवड, पत्रकार अमोल पवार, डॉ. सतीश तांबे यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोविड योद्ध्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर पुरोहित यांनी तर आभार प्रदर्शन संतोष पालशेतकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी कार्यक्षेत्रातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.