चिपळूण : विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी दि. २४ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा संप करणार आहेत. मोबाइल परत आंदोलन यशस्वी झाल्याने अंगणवाडी कर्मचारी सभेने हा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन व इतर सर्व फायदे मिळावेत, यासाठी दि.२४ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यात येणार आहे.
दीपाली पंडित यांना पुरस्कार
राजापूर : राजापूर उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून दीपाली दीपक पंडित यांना प्रशासकीय सेवेत बजावलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत, सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. दि. २५ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मंडणगड : तालुक्यातील पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित शिबिरात ३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले, तसेच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मंडळाकडून दहा हजारांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीकडे सुपुर्द करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
शेतीचे नुकसान
लांजा : तालुक्याच्या ग्रामीण भागात शेती तयार होत असतानाच, वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीचे नुकसान होत आहे. तालुक्यातील खेरवसे, वाडगाव, गोविळ, पालू, भांबेड, हर्दखळे, खोरनिनको, शिपोशी, पडवण, वाघणगाव या ठिकाणी माकडांकडून शेतीची नासाडी होत आहे. शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
गवारेड्याचा उपद्रव
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील शिवणे, माभळे, उमरे परिसरात गवारेड्यांचा मुक्त संचार सुरू असून, भात शेतीत शिरून तयार पिकाची नासाडी करीत आहेत. गव्यांकडून पसविलेल्या भाताचेही मोठे नुकसान होत असल्यामुळे गवारेड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.