रत्नागिरी : सोमवारी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३५ पर्यंत खाली आलेली असतानाच मंगळवारी पुन्हा २४ तासांत नव्याने ८९ रुग्णांची वाढ झाली आहे. तर दोघांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. १३९ रुग्ण बरे झाले आहेत, तर अबाधित रुग्णांची संख्या २४९० इतकी आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या ७७ हजार ३५७ इतकी आहे तर २३९६ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ७३ हजार ३६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून तब्बल ७ लाख ३१ हजार ८६३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटल्याचे चित्र जिल्ह्यात दिसू लागले आहे. सोमवारी या संख्येत अधिकच घट झाली. या दिवशी ३५ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले तर या दिवशी एकाही मृत्यूची नोंद नव्हती. मात्र, मंगळवारी पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. २४ तासांत सापडलेल्या या रुग्णांमध्ये अँटिजन चाचणीत पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या ६३ तर आरटीपीसीआर चाचणीत पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या २६ आहे. खेड आणि रत्नागिरी तालुक्यातील प्रत्येक एक अशा एकूण दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सध्या ५९८ रुग्ण उपचार घेत असून यापैकी गृह विलगीकरणात असलेल्यांची संख्या ३२९ तर संस्थात्मक विलगीकरणात असलेल्यांची संख्या २६९ इतकी आहे. आतापर्यत २३९६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ५० आणि त्यापेक्षा वरील वयोगटातील रुग्ण २०१२ तर सहव्याधी असलेल्यांची संख्या ८४३ आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या आकडेवारीतही वाढ होऊ लागली असून बरे होणाऱ्यांची टक्केवारी ९६.१३ इतकी असून मृत्यूचे प्रमाण ३.१० टक्के इतके आहे.
सध्या उपचार घेत असलेल्या ५९८ रुग्णांपैकी लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या ३५७ तर लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या २४१ इतकी आहे. आतापर्यंत एकूण ८ लाख ९ हजार ३८३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी आरटीपीसीआर चाचण्या ३ लाख ७६ हजार ४८९ तर अँटिजन चाचण्यांची संख्या ४ लाख ३२ हजार ८९४ इतकी आहे.