सावळाराम भराडकर - वेंगुर्ले -कोकण म्हटलं की, डोळ्यासमोर येतात निळेशार समुद्रकिनारे, रम्य, शांत वातावरणातील स्वच्छ किनारे, पांढरी शुभ्र वाळू. मात्र, गेल्या काही वर्षांत सागरी प्रदूषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता कोकणातील किनारपट्टीवर मानवनिर्मित कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहे. पर्यटनाच्या दृष्टीने ही भयावह बाब असून, वाढते प्रदूषण मानवी जीवनासह सागरी जीवसृष्टीसही अपायकारक ठरणार आहे. याबाबत वेळीच जनजागृती व उपाययोजना होणे गरजेचे बनले असून किनारपट्टीवरील स्थानिक जनतेने जागरूक होणे महत्त्वाचे ठरणार आहे. नयनरम्य, निळेशार, स्वच्छ समुद्र किनारे, शुभ्र वाळू यामुळे कोकणातील सागरी किनारे पर्यटकांना भुरळ पाडत होते. मात्र, आजूबाजूच्या परिसरात स्थानिकांकडून टाकण्यात आलेला कचरा ठिकठिकाणच्या नदीनाल्यातून वाहत येऊन किनारपट्टीवर साचला जातो. काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणावर हा कचरा किनारपट्टीवर संपूर्णत: विखुरलेला निदर्शनास येत आहे. यामध्ये काटेरी झुडपे, फाटलेले कपडे, प्लास्टिक पिशव्या, चप्पल, खाण्याच्या वस्तूंची वेष्ठने, डबे, काचेचे बल्ब, ट्युब, काचेच्या बाटल्या, थर्माकॉल, गाड्यांचे टायर, फाटलेली जाळी, दोरखंड, पत्र्याची वस्तू, कुजलेले मासे, तेलाचे तवंग, लाकडी आेंडके व इतर मानवनिर्मित टाकाऊ वस्तू व आता ई-कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यात आता शाळा-महाविद्यालयीन सहली, खेळ, मनोरंजक कार्यक्रम यांचे आयोजन समुद्र किनारी होत असल्याने जेवणासाठी लागणाऱ्या साहित्याचे व तत्सम वस्तू तेथेच टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात जेवणाच्या पत्रावळी, प्लास्टिक ग्लास, चमचे, बाटल्या यांचे वाढते प्रमाण निदर्शनास येते, तर पार्ट्यांचे आयोजन समुद्र किनारी होत असल्याने दारूच्या बाटल्या व इतर वस्तू किनारी टाकल्या जातात. किनारपट्टीवरील हे वाढते प्रदूषण मानवी जीवनासह समुद्रातील जीवसृष्टीस घातक ठरत आहे, असे दिसून आले आहे.समुद्रमार्गे होणाऱ्या तेल वाहतुकीवेळी अपघात होऊन तेल गळतीने समुद्राच्या पाण्यावर तेलाचे तवंग निर्माण होतात. याचा दुष्परिणाम सागरी जीवसृष्टीवर होतोच, शिवाय हे तवंग किनारी येऊन शुभ्र वाळू काळीकुट्ट बनते व चिकटमय होते. याचा थेट परिणाम स्थानिक जनतसेह मच्छिमार व पर्यटकांवर होतो. मात्र, यात सर्वांत महत्त्वाचे मानव जीवनातील प्लास्टिकचे प्रमाण. कारण प्लास्टिकमुळे कित्येक आरामदायी वस्तू कमीत कमी किमतीत मिळतात व याच वस्तू समुद्रात फेकल्या जातात. वजनाने हलक्या असल्याने त्या दूर अंतरावर वाहून जातात आणि याच वस्तू सागरी जीवसृष्टीस हानिकारक व प्राणघातक ठरत आहेत. असे असूनही दिवसेंदिवस प्लास्टिकचे प्रमाण वाढतच आहे. त्यात अशा वस्तूंच्या विघटनास बराच अवधी लागत असल्याने चौपाटीवर प्लास्टिक जास्त प्रमाणात इतरत्र पसरलेले दिसत आहे. या व अशा विविध कारणांनी आज सागरी प्रदूषण होत आहे. परंतु, सागरी पर्यावरणाच्या सुरक्षिततेबाबत गांभीर्याने विचार होत नसल्याचे दिसून येत आहेत.सेवाभावी संस्था, मंडळे, शाळा, महाविद्यालये यांच्यासह नागररिकांनीही जागरूक होणे गरजेचे आहे. कारण समुद्र केवळ मच्छिमारांसाठीच फायद्याचा नसून, हवा संतुलन, सागरी पर्यावरण, अर्थकारण, व्यापार, दळणवळण व पर्यटनदृष्ट्या फार महत्त्वाचा आहे. त्याला वाचविण्यासाठी शासनासह जनतेने उपाययोजना आखून किनारी साचलेल्या कित्येक टन कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. पर्यावरणावरही परिणामपर्यटन महामंडळ पर्यटनाचा विचार करून नवनवीन उपाययोजना राबविते. मात्र, इतर उपक्रमांबरोबरच समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याबाबतही गांभीर्याने विचार करून तशा उपाययोजना अमलात आणल्या पाहिजेत. निसर्गाने मुक्त हस्ताने कोकणावर सौंदर्याची उधळण केली आहे, परंतु वाढत्या प्रदूषणाचा विचार करता येथील निसर्ग सौंदर्यामध्ये बाधा येऊ लागली आहे. याचा परिणाम पर्यटनाबरोबरच पर्यावरणही होत आहे. त्यामुळे पर्यावरण सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दंडात्मक कारवाईची गरजआज राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे स्वच्छता केली जाते, त्याचप्रमाणे सागरकिनारे स्वच्छ झाले पाहिजेत. ‘स्वच्छ किनारे’ मोहीम राबवून तसेच किनाऱ्यांवर पर्यटकांच्या वर्दळीच्या ठिकाणी कचरापेट्या ठेवणे आवश्यक आहे.मच्छिमार आजही खराब झालेले मासे समुद्र किनारी फेकून देतात. त्यामुळे दुर्गंधीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अशा मच्छिमारांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून देऊन, प्रसंगी दंडात्मक कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालणे आवश्यक आहे.
किनारपट्टीवर साचताहेत कचऱ्याचे ढीग
By admin | Updated: February 15, 2015 23:43 IST