आविष्कार देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये रेतीमाफियांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोट्यवधी रुपयांची लूट रोखण्यासाठी तत्पर असणाऱ्यांना थेट ते आपल्या गन पॉइंटवरच घेत आहेत. त्यांच्या वाढत्या दहशतीपुढे जिल्हा महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन गुडघे तर टेकत नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. पर्यावरणाची बेसुमार लूट करणाऱ्या या काळ्या व्यवसायामध्ये राजकीय गुंडगिरी अधिक वाढली आहे. धरमतर खाडीकिनारी मंगळवारी रायगड जिल्हा काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष उमेश ठाकूर याने एका बांधकाम व्यावसायिकावर पिस्तूल रोखून ठार मारण्याची धमकी दिली, तर रोहे येथे रेतीची अवैध वाहतूक करणारे सलिम अजगर मिया, रमिज रज्जाक डांगे, रज्जाक शेख मोहमद डांगे यांनी कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. त्यामुळे अवैध गोरखधंदा रोखण्यासाठी तत्पर सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ आता बांधकाम व्यावसायिकांनाही राजकीय गुंडगिरीचा सामना करावा लागत आहे.रायगड जिल्ह्याला विस्तृत समुद्रकिनाऱ्यासह काही महत्त्वाच्या खाड्या लाभल्या आहेत. ही ठिकाणे मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खननाची केंद्रे बनली आहेत. रेतीचा अवैध उपसा करून कोट्यवधी रुपयांची लूट जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू असल्याचे घडलेल्या घटनांवरून स्पष्ट होते. या व्यवसायामध्ये बरीच आर्थिक गणिते लपलेली असल्याने कोणाचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत हे सांगण्याची गरज नाही. कोट्यवधी रुपयांच्या या काळ्या अर्थकारणामध्ये भ्रष्टाचाराची फार मोठी साखळी कार्यरत आहे. त्याचमुळे घडणाऱ्या गुन्ह्यांकडे गंभीरपणे पाहिले जात नाही हे जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननावरून दिसून येते.उरण तालुक्यातील करंजा रोड येथील मंगेश ठाकूर यांचा बांधकामाचा व्यवसाय आहे. काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचा मुलगा उमेश ठाकूर हा युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे. उमेश आणि मंगेश यांचे रेती व्यवसायावरून कडाक्याचे भांडण झाले होते. हे प्रकरण १४ एप्रिलनंतर पोयनाड पोलीस ठाण्यात पोचले होते. तेथे दोघांमध्ये समेट घडवून आणण्यात पोलिसांना यश आले होते. परंतु उमेश त्यानंतरही फोन करून मंगेश यांना धमक्या देत होता, अशी तक्रार मंगेश यांनी रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्याकडे केली होती.धरमतर खाडी येथे मंगळवारी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यावेळी उमेश यांनी सहकाऱ्यांसह मंगेश यांना शिव्या दिल्या. त्यानंतर संतापलेल्या उमेश याने मंगेश यांच्यावर थेट पिस्तूल रोखून ठार मारण्याची धमकी दिली. मंगेश यांनी थेट पोयनाड पोलीस ठाणे गाठले आणि उमेश ठाकूर यांच्यासह सहा जणांविरोधात तक्रार केली. पोलिसांनी उमेश ठाकूर यांच्यासह अन्य सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला. अद्याप कोणालाही अटक के ली नाही. या प्रकरणात परस्पर विरोधी तक्रार दाखल झाली असल्याची माहिती पोयनाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आर.एन.राजे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जिल्ह्यातील रेतीमाफिया पुन्हा सक्रिय
By admin | Updated: May 12, 2017 01:56 IST