दासगांव : दासगांव खाडीपट्ट्यातील दाभोळ गावात गेल्या आठवड्यात चोरांनी १७ घरे फोडली होती. याप्रकरणी सात दिवस उलटून देखील महाड तालुका पोलीस या चोरीचा छडा लावण्यास अपयशी ठरले आहेत. तालुका पोलीस हद्दीत गेल्या दोन वर्षांत जवळपास ३२ चोऱ्या तर सात घरफोड्यांचे प्रकार घडले आहेत. तालुक्यात वारंवार होणाऱ्या चोऱ्या आणि चोरांचा छडा लागत नसल्याने ग्रामीण भागात ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.महाड तालुक्यात ग्रामीण भागात चोरीचे प्रमाणात वाढ होत असून, नुकतीच दाभोळ गावात अज्ञात चोरांनी मध्यरात्रीच्या सुमारास गावात प्रवेश करून गावातील जवळपास १७ बंद घरांचे कडीकोयंडे तोडले. पोलिसांनी या ठिकाणी तत्काळ धाव घेतली असली तरी जवळपास सात दिवस उलटून गेले तरी अद्याप चोरांचा माग काढण्यात महाड तालुका पोलिसांना यश आलेले नाही. यामुळे दाभोळ ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. महाड तालुक्यात गेल्या दोन वर्षांत ३२ चोऱ्या, तर सात घरफोड्या झाल्या आहेत. मात्र यापैकी अनेक चोऱ्यांचा तपास लागलेला नाही. दाभोळ चोरीनंतर महाड तालुका पोलिसांनी नाकाबंदी, कोम्बिंग आॅपरेशन सुरू केले आहे. बंद घरांबाबत देखील दक्षता घेण्यात आली आहे. चोरांचा तपास लवकरात लवकर लावण्यात येईल. पोलीस गस्तीत देखील वाढ केली आहे.- विश्वनाथ तोडकरी, पो. उपनिरीक्षक
दाभोळ चोरी प्रकरणी पोलीस अपयशी
By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST