- जयंत धुळप, अलिबागदिघीपोर्ट (रायगड) ते पुणे, जयगड (रत्नागिरी) ते कोल्हापूर आणि विजयदुर्ग (सिंधुदुर्ग) ते कोल्हापूर-बेळगाव या कोकण घाटमाथ्यास जोडणाऱ्या चार महत्त्वपूर्ण महामार्गांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होण्याची शक्यता आहे. यासाठी सूक्ष्म प्रकल्प अहवाल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने २७ जानेवारीला मागविले असल्याने कोकणातील नवी रोजगारनिर्मिती दृष्टिपथात येऊन, कोकणातून शहराकडे होणारे स्थलांतर थांबण्याचे सुचिन्ह निर्माण झाले आहे.कोकणातील मुख्य संसाधन असलेल्या समुद्र आणि खाडीकिनाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी महामार्ग दर्जाचे रस्ते नसल्याने सागरी पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या दोन्हीतून प्रचंड रोजगार क्षमता असताना सुद्धा सह्याद्रीपलीकडे पोहोचू शकलेले नाही. परिणामी गेल्या अनेक वर्षांत रोजगारनिर्मिती झाली नसल्याने दरवर्षी कोकणातील लोकांचे प्रचंड प्रमाणात स्थलांतर शहराकडे होत राहिले. कोकणातील जमिनी अनेक कारणासाठी सातत्याने विकल्या गेल्या. या समस्येवर मात करून चार महामार्ग विकसित करून कोकण-घाटमाथा असे दळणवण वृद्धिंगत करणे अत्यावश्यक आहे. यासाठी दिवेआगर येथील सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष मनोज गोगटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गतवर्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रस्ते व बंदर विकास विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ईमेल करून लक्षात आणून दिले होते. त्याचबरोबर भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या श्रीवर्धन भेटीच्या वेळी त्यांनाही ही बाब लक्षात आणून देऊन निवेदनही दिले होते. या तिघांनीही त्याची दखल घेतल्याचे गोगटे यांनी सांगितले.२३० किमी अंतराच्या दिघीपोर्ट (रायगड) ते पुणे या महामार्गासाठी केंद्र शासन व राज्य शासन निधी देणार किंवा दिघी पोर्ट विकासकाकडून निधी भांडवली स्वरूपात घेणार, असे प्राथमिक नियोजन आहे. दिघी पोर्ट विकासकाने एक किलोमीटरचा सकलप बायपास रोड अनेक वर्षे पूर्ण केला नाही. शासनाची रॉयल्टी, कर्मचाऱ्यांचे पगार थकवले आहेत. यासाठी आर्थिक नियोजन आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिल्याचे गोगटे म्हणाले.पाठपुरावा अपेक्षित- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कोकणातील या चार महामार्गांच्या निर्मितीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे, परंतु या चारही महामार्गांसाठी निधीची तरतूद होऊन ते नियोजित वेळेत पूर्ण होण्याकरिता आता कोकणातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी विकासाचा मूद्दा विचारात घेऊन पाठपुरावा करणे आवश्यक असल्याची अपेक्षा गोगटे यांनी व्यक्त केली आहे.
महामार्गांचा प्रकल्प अहवाल मागवला
By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST