रोहा : तालुक्यासह जिल्ह्यातील उर्वरित भागातही गेले काही दिवस तापमान कमालीचे घसरले आहे. गेल्या सप्ताहापासून तर तापमान १६ अंशांपर्यंत तर कधी यापेक्षाही खाली आल्याची नोंद झाली आहे. यामुळे संपूर्ण रायगड जिल्हा गारठला आहे. थंडीमुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.यंदा वेळेत दीपावली सणाच्या दरम्यान थंडीचे अगमन झाले. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये वातावरणात अचानक बदल घडत गेले, तापमान अचानक १६ अंशांहून खाली आल्याने थंडीचा जोरदार कडाका पडला आहे, वाढीस लागलेल्या या थंडीचा सामना करताना सर्वांचीच तारांबळ उडत आहे. सायंकाळी ६ नंतर सूर्य मावळताच थंडीचा जोर वाढत असल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. स्वेटर, मफलर, कानटोप्या आदी गरम कपड्यांची गरज भासत आहे. भल्या पहाटे औद्योगिक वसाहतीत रोजीरोटीसाठी जाणाऱ्या कामगारांची कडाक्याच्या थंडीत त्रेधातिरपीट उडत आहे. दररोज धुक्याच्या छायेतून यांना आपली वाट काढताना त्रास सहन करावा लागत आहे. परप्रांतातून मोलमजुरी साठी कोकणात आलेली असंख्य कुटुंबे झोपड्यांमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांची लहान मुले तर या थंडीत अजारी पडत आहेत. तर सध्या रोहा तालुक्यात थंडीमुळे खोकला, सर्दी, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. थंडीचा हा कडाका वाढण्याची शक्यता आहे.महाडमध्ये थंडी वाढली च्दासगाव : गेल्या काही दिवसांपासून महाडमध्ये चांगली गुलाबी थंडी पडली आहे. रात्री शेकोटीवर शेक घेणे, तर सकाळी कोवळ्या उन्हात बसण्याचा आनंद लोक घेत असल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे. या गुलाबी थंडीमुळे परिसरात पहाटे धुक्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असून, मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणारे वाहनचालक या दाट धुक्यामुळे त्रस्त झाले आहेत. थंडी वाढल्यामुळे याचा कडधान्य शेतीला चांगला फायदा होणार असून, पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे उत्पन्न चांगले येईल, या अपेक्षेने येथील शेतकरी सुखावला आहे.गेल्या १५ दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले असून महाडकर थंडीचा आनंद घेत आहेत. महाड तालुक्यातील रवाडी पट्टा आणि माणगांव तालुक्यातील दक्षिण भाग या परिसरात कडधान्य शेती केली जाते. तूर, मूग, मटकी, पावटा, वाल, हरभरा या कडधान्यांचा हा परिसर आगार आहे. दाट धुक्यामुळे या कडधान्य शेतीला पोषक वातावरण निर्माण झाले झाले आहे.
रायगड जिल्ह्यातील तापमानात घसरण
By admin | Updated: January 10, 2017 05:56 IST