पुणे : पादचाऱ्याला रस्त्यावरचा राजा समजले जाते. चालणाऱ्या व्यक्तीला प्रथम प्राधान्य दिले जाते. प्रत्यक्षात मात्र हा राजा रोजच जीव मुठीत धरून वावरताना दिसत असून, पुण्यातील जवळ जवळ सर्वच सिग्नल वर पादचाऱ्यांची कुचंबणा होताना दिसत आहे. वाहनचालक झेब्रा क्रॉसिंग वरच वाहने थांबवत असल्याने पादचाऱ्यांनी चालायचे कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पुण्याची लोकसंख्या गेल्या दहा वर्षांत झपाट्याने वाढली आहे. दररोज नवी वाहने रस्त्यावर दाखल होत आहेत. त्यामुळे वाहतुकीत मोठ्याप्रमाणावर वाढ होत आहे. एकीकडे वाहनांची संख्या वाढत असताना पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा व त्यांच्या सोयी-सुविधांचा फारसा विचार होताना दिसत नाहीये. पुण्यातील बहुतांश सिग्नलला वाहने झेब्रा क्रॉसिंगलाच उभी केली जात असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यातही गजबजीच्या रस्त्यांवर तर नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येते. वाहतूक पोलिसांकडून अनेकदा कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, काही काळाने परिस्थिती ‘जैसे थे’च होते. पादचाऱ्यांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा, यासाठी लागणाऱ्या विशिष्ट सिग्नलची संख्या पुण्यात बोटावर मोजण्या इतकीच आहे. जास्त पादचारी संख्या असलेल्या रस्त्यांवर अशा प्रकारचे सिग्नल उभारण्यात येतात. पुण्यातील जंगलीमहाराज रस्त्यावर डेक्कन जिमखाना बस स्थानकाजवळ असणाऱ्या अशा सिग्नलला अनेकदा पोलीस कर्मचारी उभा असेल तरच वाहनचालक सिग्नलला थांबतात. त्यातही झेब्रा कॉसिंगच्या नियमाचे पालन करणाऱ्यांची संख्या कमीच असते. अशीच परिस्थीती इतर ठिकाणांची आहे. वाहनचालकांनी जरी झेब्रा क्रॉसिंगची शिस्त पाळणे अपेक्षित असले, तरी रस्ते व झेब्रा क्रॉसिंगची रचना निर्दोष असणे तितकेच गरजेचे आहे. शहरातील बहुतांश ठिकाणी या रचनेवर लक्ष देण्यात आलेले नाही. त्याचबरोबर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पुरेसा वेळही देण्यात येत नाही. रस्त्याच्या लांबीनुसार वेळ ठरवणे अपेक्षित असताना तसा वेळ दिला जात नाही. ‘लोकमत’शी बोलताना पादचारी प्रथम या संघटनेचे प्रशांत इनामदार म्हणाले की, दहा मीटरचा रस्ता असल्यास किमान पंधरा सेकंद वेळ देणे अपेक्षित आहे. पादचाऱ्यांच्या सोयीसाठी सर्वप्रथम रस्त्याच्या रचनेतील दोष दूर करणे गरजेचे आहे. अनेकदा झेब्रा क्रॉसिंगचा पट्टा तिरपा मारला जातो. तर काही ठिकाणी जेथे हा पट्टा संपतो तेथे दुभाजक आलेला असतो. स्टॉपलाइन, सिग्नलचे खांब हेही निर्दोष असणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे दर तीन महिन्यांनी रंगवायला हवे. लोकांची मानसिकता बदलणे हा यातील सर्वांत मोठा भाग असला, तरी पादचाऱ्यांसाठी योग्य रचनेचा रस्ता तयार करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. (प्रतिनिधी)
झेब्रा क्रॉसिंग फक्त शोभेलाच
By admin | Updated: March 22, 2017 03:36 IST