सुनील राऊत/महेंद्र कांबळे, बारामतीपाण्यासाठी वणवण करावी लागत असतानाच आता राज्य शासनाने उद्योगांना देण्यात येणाऱ्या पाण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने बारामती परिसरातील बारामती, जेजुरी तसेच कुरकुंभमधील तब्बल ८० हजार कर्मचाऱ्यांना बेरोजगाराचा सामना करावा लागणार आहे. या तिन्ही एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांचा पाणीसाठा कमालीचा घटल्याने ही परिस्थिती ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिन्ही एमआयडीसींमध्ये सुमारे ५००हून अधिक लहानमोठ्या औद्योगिक कंपन्या आहेत. या कंपन्यांना लागणारा कच्चा माल तसेच पूरक साहित्य उपलब्ध करून देणारे इतर लहानमोठे व्यवसायही बंद पडणार आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या परिस्थितीने कष्टकऱ्यांच्या पोटाचाही प्रश्न निर्माण होणार असल्याने लोकांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. बारामती एमआयडीसी थांबणार?बारामती एमआयडीसीला उजनी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणी सुमारे ३०० हून अधिक लहानमोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्या तसेच आवश्यक असलेले पूरक साहित्य पुरविणाऱ्या कंपन्यांत मिळून सुमारे ५० हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या कंपन्यांसाठी दरदिवशी १० ते १२ एमएलडी पाण्याची आवश्यकता भासते. १९९० पासून म्हणजेच एमआयडीसी सुरू झाल्यापासून २४ तास पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, या वर्षी उन्हाळ्यात निर्माण झालेली पाणीटंचाई आणि त्यानंतर पावसाळा सुरू होऊन तीन महिने लोटले, तरी पुरेसा न झालेला पाऊस यांमुळे पाच महिन्यांपासून पाच ते सहा तासच पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आता उजनी धरणाची पाणीपातळीही कमालीची खालावल्याने तसेच शासनाने उद्योगांचे पाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने हे पाणीही बंद झाल्यास या एमआयडीसीमधील उत्पादन २५ वर्षांत पहिल्यांदाच थांबेल. ...तर बाजारपेठाही होतील ठप्प पाण्याअभावी या कंपन्यांचे कामकाज बंद पडून या कामगारांचा रोजगार हिरावणार असून, त्याचा थेट परिणाम या परिसरात विकसित झालेल्या बाजारपेठांवर होईल. या महिन्यात गणेशोत्सव, तर पुढील दोन महिन्यांत दसरा-दिवाळी येत असल्याने ऐन सणासुदीच्या कालावधीत रोजगार हिरावला गेल्यास त्याचा या परिसरातील बाजारपेठांवर गंभीर परिणाम होणार असून, आर्थिक उलाढाल थंडावणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.जेजुरीला दोन दिवसांतून एकदाच पाणी जेजुरी एमआयडीसीला दडी मारलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारे नाझरे धरण कोरडे पडले असल्याने तसेच या एमआयडीसीसाठी वीर धरणाच्या मांडकी डोहातून आणलेली पर्यायी पाण्याची व्यवस्थाही पावसाअभावी कोरडीठाक पडल्याने या एमआयडीसीला आधीच दोन दिवसांतून एकदा पाणी देण्यात येत आहे. या एमआयडीसीसाठी दरदिवशी ४ ते ५ एमएलडी पाण्याची गरज भासते. त्यातच आता शासनाचा निर्णय झाल्यास या ठिकाणचे उत्पादन पूर्णपणे थांबणार आहे. या एमआयडीसीमध्ये जवळपास ४ ते ५ हजार कामगारांना रोजगार मिळालेला आहे. यात प्रामुख्याने औषधनिर्माण तसेच काही स्टील कंपन्यांचा समावेश आहे. आधीच या ठिकाणी उत्पादनावर परिणाम होण्यास सुरुवात आहे.पुण्याच्या पाण्यावर कुरकुंभचे भवितव्यकुरकुंभ एमआयडीसीला खडकवासला धरणातून जाणाऱ्या कालव्यातून पाणीपुरवठा केला जातो. या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये जेमतेम ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. याच पाण्यावर पुणे शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असल्याने या धरणांतील सर्व पाणी पुणे शहरासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय झाल्यास कुरकुंभ एमआयडीसीतील कंपन्यांचे उत्पादन ठप्प होईल. या एमआयडीसीला दरदिवशी सुमारे ७ एमएलडी पाण्याची आवश्यकता भासते. या एमआयडीसीमध्ये जवळपास १५० कंपन्या असून, त्या ठिकाणी तब्बल १२ ते १३ हजार कामगार आहेत. त्यामुळे एमआयडीसीचे भवितव्य पुण्याच्या पाण्यावर अवलंबून असल्याचे स्पष्ट आहे.
दुष्काळ हिरावणार ८० हजार जणांचे काम
By admin | Updated: September 3, 2015 03:13 IST