लोकमत न्यूज नेटवर्कजुन्नर : शहरातील बेघर महिलांचा पंतप्रधान आवास योजनेत समावेश करून त्यांना तातडीने घरकुल मिळवून देण्याच्या मागणीसाठी मातृभूमी बेघर महिला आघाडी जुन्नर तालुका यांच्या वतीने जुन्नर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.शहरातील बेघर महिला मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मोर्चेकऱ्यांच्या वतीने जुन्नर तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. शिवसेना गटनेते दीपेश परदेशी, नगरसेवक समीर भगत, शिवसेना शहरप्रमुख नगरसेवक अविनाश करडिले आदींनी नगरपालिकेच्या वतीने निवेदन स्वीकारले. मातृभूमी बेघर आघाडीचे अध्यक्ष संभाजी साळवे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले. जुन्नर शहरातील बेघर महिला सन १९८४पासून शासनाकडे घरासाठी जागेची मागणी करीत आहेत.मोर्चात तारा वंजारी, रंजना शहा, अनिता महाबरे, उषा तेलोरे, अंजुताई कुटे, नफिसा इनामदार, सना जमादार, नजमा बेपारी, दीपक चिमटे आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह जवळपास ४०० महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या. बेघर महिलांच्या प्रश्नांबाबत नगरपालिका गांभीर्याने प्रशासकीय कार्यवाही करेल, असे आश्वासन शिवसेना गटनेते दीपेश परदेशी यांनी नगरपालिकेच्या वतीने दिले.- जिल्हाधिकारी पुणे यांनी सन १९८९मध्ये ५ हेक्टर ५५ गुंठे जागा नगरपालिकेच्या ताब्यात दिलेली आहे. ही जागा नगरपालिकेच्या वाढीव क्षेत्रात असून, जागेचे ६ सिटी सर्व्हे नंबर आहेत. शासनाने व नगरपालिकेने स्वखर्चाने ३ वेळ जागेची मोजणी करून घेतलेली आहे. - १९८९मध्ये नगरपालिकेने बेघरांकडून घरांसाठी अर्ज भरून घेतले होते. तेव्हापासून आतापर्यंत २८वर्षे बेघरांचा प्रश्न प्रलंबित पडलेला आहे. नगरपालिकेकडे जागा उपलब्ध असताना नगरपालिकेने केंद्र शासनाकडे पंतप्रधान आवास योजनेत जुन्नर शहराचा समावेश करून तातडीने योजना राबविण्याची मागणी आहे.
जुन्नर तहसील कार्यालयावर महिलांचा मोर्चा
By admin | Updated: June 13, 2017 03:56 IST