पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने विकसित केलेल्या पेठांमध्ये वाढीव बांधकामाचा प्रश्न गंभीर आहे. कृष्णानगर प्रभाग क्र. ४ मध्येही वाढीव बांधकामधारकांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. शास्तीने नागरिकांची अक्षरश: झोप उडविली आहे. हा प्रश्न शासन पातळीवर प्रलंबित आहे. तो सुटणार कधी? विकासकामांना प्राधिकरणाकडून निधी मिळणार कधी, असा प्रश्न रहिवासी करीत आहेत. महापालिका आणि पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण असा संमिश्र भाग या प्रभागात आहे. प्राधिकरणाच्या सेक्टर १८, १९, २० या भागात परिसर विभागला गेला आहे. सचिन गृहसंकुल, जिजामाता पार्क, महात्मा फुलेनगर, नूतन शाळा परिसर, शिवाजी पार्क, शरदनगर, सुदर्शननगर, कोयनानगर, शिवतेजनगर, पूर्णानगर असा हा प्रभाग आहे. या भागात प्राधिकरणाने विकसित केलेल्या तीन पेठांचा समावेश आहे. कामगार, कष्टकरी, मध्यमवर्गीय असे संमिश्र नागरिक या भागात वास्तव्यास आहेत. काहींनी प्राधिकरणाच्या विकसित गृहप्रकल्पात सदनिका घेतल्या आहेत. तर काहींनी जागा घेऊन बांधकाम केले आहे. प्राधिकरणातील सदनिकाधारकांनी आपल्या जागेत वाढीव बांधकामे केली आहेत. कोणी आपली बाल्कनी वाढविली आहे. इमारतीला वाढीव बांधकाम केले आहे. अत्यल्प दंड आकारून ही बांधकामे नियमित करावीत, असे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, महापालिका व प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचा प्रश्न राज्य शासन पातळीवर प्रलंबित आहे. ‘शासनाने हा प्रश्न सोडवून दिलासा द्यावा, तसेच या क्षेत्रातील इतर अनधिकृत बांधकामांना अडीच टक्के एफएसआय लागू करावा, अशी या भागातील रहिवाशांची मागणी आहे.
ती बांधकामे नियमित होणार कधी?
By admin | Updated: August 4, 2014 04:33 IST