पुणे : काश्मीर, वैष्णोदेवी यात्रेसाठी पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्याच्या आमिषाने महिलेची १ लाख ४३ हजार २०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी स्वागत हॉलिडेज या टुर्स कंपनीविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. केदार मोहन मेढेकर, मोहन मेढेकर व सचिन अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रीती दोशी (रा. सातारा) यांनी दिर्याद दिली आहे. स्वागत हॉलिडेजचे मालक मोहन व केदार मेढेकर हे पितापुत्र आहेत, तर सचिन हा व्यवस्थापक आहे. त्यांनी अमरनाथ काश्मीर वैष्णोदेवी या टूरसाठी पॅकेज जाहीर केले होते.यामध्ये संपूर्ण प्रवासामध्ये ए-ग्रेड हॉटेलमध्ये निवास व्यवस्था, हाऊस बोट, दिवसातून दोन वेळा शुद्ध शाकाहारी जेवण, तीन वेळा चहा किंवा कॉफी, एक वेळचा नाश्ता, एसी गाडीची व्यवस्था अंतर्भूत होती. यासोबतच अमरनाथ येथील हेलिकॉप्टरची तिकिटे असे एकूण १ लाख ४३ हजार २०० रुपये दोषी यांच्याकडून घेतले. दोशी यांना ठरलेल्या दिवशी टूरवर पाठवण्यात आले नाही. तसेच टूरसंदर्भात आरोपींकडे चौकशी करण्यासाठी वारंवार फोन करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर दोशी यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. (प्रतिनिधी)
स्वागत हॉलिडेजवर फसवणुकीचा गुन्हा
By admin | Updated: August 2, 2014 04:03 IST