पुणे : अनेक भागांना अजूनही पुरेसे पाणी मिळत नाही, २४ तास पाणीपुरवठा योजना व्हावी; मात्र दरवाढ नको, निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांचा रोष नको अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर व्यक्त केल्या. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पाणीट्टीच्या वाढीमध्ये कपात केली जाण्याची शक्यता आहे.महापालिकेमध्ये शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपट्टीमध्ये मोठी वाढ करण्याच्या मांडलेल्या प्रस्तावाला विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची महापौर बंगल्यावर बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली. पाणीपट्टी वाढीला पाठिंबा देण्याबाबत अंतिम निर्णय प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून घेणार असल्याचे पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.पाणीपट्टी वाढीवर पवार यांनी प्रत्येक नगरसेवकाचे मत जाणून घेतले. या वेळी अनेक नगरसेवकांनी पाणीपट्टी वाढीला विरोध केला. काही जणांनी २४ तास पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर करवाढ करण्यात यावी असे मत मांडले. पाणीपट्टीची थकबाकी असलेली ५०० कोटी रुपयांची थकबाकी वसूल करून ही योजना कार्यान्वित करावी, असे मत काही नगरसेवकांनी मांडले. आगामी २०१७च्या महापालिका निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांकडून पाणीपट्टीवाढीचा मोठा मुद्दा बनविला जाण्याची शक्यता असल्याने किमान आगामी वर्षाकरिता तरी पाणीपट्टी वाढ करू नये अशी भूमिका या वेळी मांडण्यात आली. पाणीपट्टी वाढीबाबतची मुख्य सभा १६ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे, तत्पूर्वी याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.शरद पवार घेणार पुण्याच्या प्रश्नांवर बैठकशहराच्या विकासाशी संबंधित अनेक प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार येत्या १४ फेब्रुवारी रोजी बैठक घेणार आहेत. या बैठकीला प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आमदार, खासदार यांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये स्मार्ट सिटी, पाणीपुरवठा योजना यासह अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
पाणीपुरवठा २४ तास व्हावा पण...
By admin | Updated: February 13, 2016 03:16 IST