जेजुरी : नाझरे जलाशयावरील पिण्याच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून मिळणारे पाणी दुर्गंधीयुक्त, वाळू व शैवाल मिश्रित असून, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. या संदर्भात पुरंदरच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांना माहिती देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप कोळविहीरे, नाझरे परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे. जलाशयावरून पारगाव, माळशिरस, कोळविहिरे १६ गावांची प्रादेशिक पाणी योजना तसेच नाझरे, पांडेश्वर ५ गावांच्या पाणीपुरवठा योजनेतून येणारे पाणी गाळमिश्रित आहे. पाण्याला दुर्गंधी येत आहे. शैवालयुक्त पाणी असल्याने ते पिण्यास अयोग्य असल्याचेच दिसून येत आहे. कोळविहिरे योजनेतून येणारे पाणी प्यायल्याने मुले आजारी पडू लागली आहेत. येथील मंगल बनसोडे या महिलेने आपल्या आजारी नातवाला जेजुरीच्या दवाखान्यात आणलेले आहे. तिने प्रत्यक्ष लोकमत प्रतिनिधीची भेट घेऊन या योजनेतील बाटलीत भरून आणलेले पाणी दाखविले. दोन वेळा गाळून तसेच दोन वेळा उकळून हे पाणी बाटलीत पिण्यासाठी घेऊन ती आलेली आहे. तरीही, या पाण्याचा उग्र वास येत आहे, रंगही दूषित झालेला आहे हे दाखविले. या वेळी कोळविहिरेचे सरपंच महेश खैरे, नाझरे क.प.च्या सरपंच हिराबाई खैरे, नाझरे क.प. सोसायटीचे अध्यक्ष बारीकराव नाझीरकर, नाझरे सुपे सोसायटीचे माजी अध्यक्ष विनायक कापरे, पांडुरंग कापरे, उत्तम कापरे, रोहिदास खैरे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
नाझरेचं पाणी, कशाला ढवळीलं...
By admin | Updated: August 18, 2015 03:47 IST