पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्म्यावरच आला आहे. त्यामुळे शहरामध्ये वर्षभर पाणीकपात लागू होण्याची दाट शक्यता आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पाण्याबाबतची परिस्थिती पालकमंत्री गिरीश बापट यांच्या निदर्शनास आणून दिली असून येत्या शनिवारी, २२ आॅगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाईल.आॅगस्ट अर्धा संपल्यानंतरही अद्याप पावसाने दडी मारल्याने धरणातील पाणीसाठ्याची परिस्थिती गंभीर बनली आहे. जिल्ह्यामध्ये सरासरीच्या ६० ते ७० टक्के इतकाच पाऊस आतापर्यंत पडला आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे पानशेत धरण ६४ टक्के, वरसगाव ४८ टक्के, टेमघर ४१ टक्के, तर खडकवासला २७ टक्के भरलेले आहे. वस्तुत: आॅगस्ट मध्यावर ही धरणे १०० टक्क्यांपर्यंत भरलेली असतात. त्यामुळे पाणीकपात करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.खडकवासला प्रकल्प सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये शहराला किती पाणी द्यायचे, याचा निर्णय घेतला जातो, येत्या २२ आॅगस्ट रोजी या समितीची बैठक बोलाविण्यात आली आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदार, पुणे महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित असतात.पानशेत, खडकवासला, वरसगाव, टेमघर या धरणांतून पिण्याबरोबरच शेतीसाठी पाणी सोडले जाते. मात्र पाणीसाठा कमी असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतीचे पाणी कमी करून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे. उर्वरित दीड महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला तरच या पाणीकपातीचा फेरविचार करता येऊ शकेल; अन्यथा वर्षभर पाणीकपातीला तोंड देण्याची तयारी पुणेकरांना ठेवावी लागणार आहे.
पुण्यावर पाणीकपातीचे संकट
By admin | Updated: August 19, 2015 00:17 IST