कुरकुंभ : कुरकुंभ (ता दौंड) परिसरातील झगडेवाडी येथील जमिनीवर सोडण्यात आलेले रासायनिक सांडपाणी हे कुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्पामधील नसुन लोखंड उत्पादन करणाऱ्या कारखान्यामधील असल्याचे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने केलेल्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. कुरकुंभ-पांढरेवाडी येथे असणाऱ्या रासायनिक प्रकल्पाचा गैरफायदा घेत लोखंड उत्पादनातील काही कारखानदार त्यांच्या कारखान्यात वापर होत असलेल्या अॅसिडयुक्त रासायनिक सांडपाणी गुपचुपपणे या परिसरात सोडुन देत असल्याचे निष्पन्न झाले आहे.झगडेवाडी परिसरात सोडण्यात आलेल्या रासायनिक सांडपाण्याचे नमुने १० आॅगस्ट रोजी तपासासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जगन्नाथ साळुंके यांनी घेतले होते़ त्यांच्या तपासात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. दरम्यान परिसरात भांडगाव, बारामती, जेजुरी, इंदापूर या ठिकाणी लोखंडाचे उत्पादन करणारे कारखाने आहेत. या सर्व कारखान्यांचे नमुने तपासासाठी घेवुन पुढील निष्कर्ष काढल्यानंतरच कारवाई करण्याचे लेखी आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे विभागाचे अधिकारी जगन्नाथ साळुंके यांनी सांगितले. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील जवळपास सर्व रासायनिक कारखान्याचे सांडपाणी सामूहिक प्रक्रिया केंद्रात येत आहे़ त्यामुळे कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील हा नमुना नाही व ज्या कंपन्या या प्रक्रिया केंद्राशी सलग्न नाहीत किंवा काही नवीन उद्योग या क्षेत्रामध्ये आलेले आहेत, त्यांचा देखिल प्राथमिक स्वरुपात काही संबध वाटत नाही, असे कुरकुंभ सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे अधिकारी नरसिंग थोरात यांनी सांगितले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अशा प्रकारच्या घटनावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे अन्यथा कुरकुंभ परिसरातील प्रदूषणात आणखी वाढ होवुन सामान्य नागरिकांना, कामगारांना आयुष्य जगणे कठीण होणार आहे़ सध्याची प्रदूषणाची पातळी पाहता अशा प्रकारचे प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात घातक सिद्ध होणार आहे.(वार्ताहर)
कुरकुंभला बाहेरुन आणून टाकले जाते सांडपाणी
By admin | Updated: August 14, 2015 03:16 IST