पुणे : महापालिकेच्या १५ पैकी ९ समित्या ताब्यात ठेवण्यात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला यश आले आहे. ६ समित्यांसाठी येत्या सोमवारी (दि. ११) निवडणूक होणार असून, त्यात समसमान बलामुळे एका समितीचे अध्यक्षपद चिठ्ठीवर ठरेल. प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी (दि. ५) अर्ज भरण्याची अखेरची मुदत होती. कोथरूड प्रभाग समितीसाठी काँग्रेसच्या अश्विनी जाधव आणि मनसेच्या पुष्पा कनोजिया, घोले रस्ता प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे दत्ता बहिरट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नीलम कुलकर्णी यांनी अर्ज दाखल केले आहेत. टिळक रस्ता प्रभाग समितीसाठी राष्ट्रवादीचे विनायक हनमघर, मनसेच्या युगंधरा चाकणकर, ढोले पाटीलसाठी काँग्रेसचे बंडू गायकवाड, मनसेच्या संगीता तिकोने यांनी अर्ज दाखल केले आहेत. विश्रामबागवाडा समितीसाठी विद्यमान अध्यक्ष दिलीप काळोखे यांनीही अर्ज दाखल केला असून, त्यांच्याबरोबर मनसेच्या रूपाली पाटील-ठोंबरे यांचाही अर्ज आहे. काळोखे यांची निवड झाल्यास, ते सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष होतील. पक्षाने त्यांना अर्ज दाखल करण्यास सांगितल्यामुळे समितीतील भाजपाच्या अन्य सदस्यांमध्ये नाराजी आहे.अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेल्यांची प्रभागनिहाय नावे याप्रमाणे- कोंढवा -वानवडी - प्रशांत म्हस्के (राष्ट्रवादी), वडगाव शेरी -महेंद्र पठारे (राष्ट्रवादी), बिबवेवाडी - श्रीनाथ भिमाले (भाजपा) औध- संगीता गायकवाड (काँगे्रस), धनकवडी - अभिजित कदम (काँग्रेस), भवानी पेठ - हिना मोमीम (काँग्रेस), सहकारनगर - उषा सुभाष जगताप (राष्ट्रवादी), येरवडा - किशोर विटकर (राष्ट्रवादी), हडपसर-फारुख इनामदार (राष्ट्रवादी), राष्ट्रवादी ५, काँग्रेस ३ व भाजपा १ अशी ही विभागणी आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या ताब्यात प्रभाग समित्या
By admin | Updated: April 6, 2016 01:33 IST