जिल्ह्यात १५ जानेवारीला पार पडलेल्या १८०० हून अधिक ग्रामपंचायतींपैकी उरुळी कांचन या एकमेव ग्रामपंचायतीची निवडणूक ही पक्षविरहित व पॅनेलविरहित लढवली गेली होती. दरम्यान आजच्या आरक्षणामुळे उरुळी कांचन ग्रामपंचायतीची निवडणूक पक्षनिहाय अथवा पॅनेलनिहाय लढली गेली नसल्याने, सरपंचपदासाठी ग्रामपंचायत स्तऱावरील विविध गट एकत्र येणार असल्याने घोडेबाजार रंगणार ही बाब नक्की झाली आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या सतराही जागा उरुळी कांचनच्या राजकारणातील विविध गटांनी आपापल्या पद्धतीने एकत्र येत, आपल्या सोईनुसार आघाड्या करुन लढविलेल्या होत्या. मागील पाच वर्षांपूर्वीही हाच प्रयोग उरुळी कांचनच्या राजकारणात रंगला होता. मागील पाच वर्षांत सरपंच व उपसरपंचपदासाठी झालेला सावळा गोंधळ पाहता पुढील पाच वर्षेही हाच प्रयोग उरुळी कांचनच्या ग्रामपंचायतीत चालणार का, असा प्रश्न उपस्थित होताना चर्चेत आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वसाधारण प्रर्वगातून अमितबाबा कांचन, राजेंद्र बबन कांचन, माजी उपसरपंच संतोष हरिभाऊ उर्फ पप्पु कांचन, माजी उपसरपंच भाऊसाहेब लक्ष्मण कांचन व सुनिल तांबे हे प्रमुख इच्छुक निवडून आले आहेत.
.पुर्व हवेलीमधील लोणी काळभोर, उरुळी कांचन, सोरतापवाडी, थेऊर, कुंजीरवाडी, शिंदवणे या मोठ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुरुष की स्त्री आरूढ होणार? आपल्या गावचा सरपरंच कोणत्या प्रवर्गातील असणार? आपल्याच गटाचा होणार? की समोरच्या गटाचा होणार? याकडे १८ जानेवारीला निवडून आलेल्या अकराशेहून अधिक नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे लक्ष लागून राहिले होते. या आरक्षण सोडतीमुळे वरील प्रश्नांना आता पूर्णविराम मिळालेला आहे.
शिंदवणे ग्रामपंचायतीत विद्यमान (माजी) सरपंच आण्णासाहेब महाडिक गटाची पुन्हा एकदा सत्ता आली असून, पुढील पाच वर्षांसाठी सरपंच सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने, पुढील सरपंच आण्णासाहेब महाडिक यांची पत्नीच असणार का अन्य कोण होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.