पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रथम सत्राच्या परीक्षांसाठी प्रॉक्टर्ड पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. परंतु, विद्यार्थ्यांमध्ये याबाबत पुरेशी जागरुकता केलेली नाही. मात्र, विद्यापीठाने लाखो रुपये खर्च करून परीक्षेदरम्यान होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी ‘इमेज प्रॉक्टरिंग’ पद्धतीचा अवलंब करण्याचे निश्चित केले आहे. परिणामी घरी बसून परीक्षा देताना गैरवर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठातर्फे प्रथम सत्राच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जात आहेत. विद्यापीठ प्रशासनाने परीक्षेसाठी एजन्सी निवडण्याच्या प्रक्रियेत चूक केल्यामुळे १५ मार्च रोजी सुरू होणाऱ्या परीक्षा एक महिना पुढे ढकलण्याची वेळ विद्यापीठावर आली. मात्र, आता विद्यापीठाने स्वत: च्याच एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशन या कंपनीच्या माध्यमातून परीक्षा घेण्याचे निश्चित केले. विद्यापीठाच्या कंपनीने एका वेगळ्या कंपनीचे व्यासपीठ आणि तांत्रिक सपोर्ट वापरून परीक्षा घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांदरम्यान झालेल्या गैरप्रकारामुळे विद्यापीठाची नाचक्की झाली. काही विद्यार्थी ऑनलाइन परीक्षेसाठी ग्रुप करून परीक्षा देत असल्याने दिसून आले होते. त्यामुळे विद्यापीठाने प्रॉक्टर्ड पद्धतीचा अवलंब करून परीक्षा घेण्यास सुरुवात केली. येत्या ११ एप्रिलपासून घेतल्या जाणारी परीक्षा प्रॉक्टर्ड पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्याने परीक्षेदरम्यान केलेल्या हालचालीची माहिती साठवून ठेवली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्याने गैरवर्तन केल्यास त्याला सूचना पाठवली जाईल.
ऑनलाइन परीक्षा असल्याने आपल्यावर कोणी लक्ष ठेवणार नाही. पुस्तकातून, गुगलवरून उत्तरे शोधून लिहिता येतील, या भ्रमात एकाही विद्यार्थ्याने राहू नये. प्रॉक्टर्ड परीक्षेसाठी विद्यापीठाने लाखो रुपये खर्च केले आहेत, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.