पिंपरी : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीसाठी गल्लीपासून ते प्रमुख चौकांपर्यंत ठिकठिकाणी फटाका विक्रीची बेकायदा दुकाने थाटायला सुरुवात झाली आहे. फटाके विक्रीसाठी अग्निशामक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि संबंधित पोलीस ठाण्याची परवानगी बंधनकारक आहे. मात्र, परवान्यासाठी १२७ अर्ज दाखल झाले असून, ११२ जणांना विक्रीचे परवाने दिल्याची अधिकृत माहिती आहे. मात्र, शहरभरात प्रत्यक्षात एक हजारहून अधिक दुकानातून बेकायदा फटाका विक्री सुरू असल्याचे दिसून आले. मात्र, या अनधिकृत दुकाने व बेकायदा विक्रीवर कारवाई करण्याकडे महापालिका प्रशासन व पोलीस डोळेझाक करीत आहेत. शहरामध्ये फटाकेविक्रीचे दुकान लावण्याकरिता परवाना घेण्यासाठी महापालिकेच्या अग्निशामक विभागातर्फे पिंपरीतील संत तुकारामनगर येथील मुख्य केंद्रात अर्ज विक्रीची सुविधा होती. साधारण १९ ते ३० आॅक्टोबर दरम्यान १२७ जणांनी अर्ज घेतले. कागदपत्रांची तपासणी करून मंगळवारपर्यंत ११२ जणांना फटाके विक्रीचे परवाने दिले आहेत. या परवान्यानुसार विक्रेत्यांना १३ नोव्हेंबरपर्यंतच दुकान लावता येणार आहे. परवाना मिळाल्यानंतर त्या व्यक्तीने अग्निशामक विभागातर्फे दिलेल्या परवान्याची प्रत संबंधित पोलीस ठाण्यात देणे अपेक्षित आहे. मात्र, शहरातील ८० ते ९० टक्के विक्रेत्यांनी पोलिसांची परवानगी न घेता दुकाने थाटली आहेत. पिंपरीगाव, चिंचवडगाव, काळेवाडी या भागातील मुख्य रस्त्यांवर, तसेच आकुर्डी, निगडी, सांगवी, वाकड, थेरगाव या भागात फटाके विक्रीची शेकडो छोटी-मोठी दुकाने दिसून येत आहेत. कायद्याचा धाक न बाळगता ठिकठिकाणी ही दुकाने उभारली जात असून, एखादी दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण राहील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.किराणा दुकानातून विक्री...पिंपरीत एका ठिकाणी किराणा दुकानातदेखील फटाके विक्रीला ठेवल्याचे दिसून आले. तसेच पिंपरीमध्येही एका बाजूला कापड दुकान, तर दुसऱ्या बाजूला इलेक्ट्रिकल्सचे दुकान असलेल्या ठिकाणी फटाक्याची विक्री राजरोस सुरू आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर पोलिसांना जाग येणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी) आरसीसी बांधकामाच्या ठिकाणीच फटाका विक्रीचे दुकान असावे, तसेच ९ मीटरचा रस्ता असेल, त्या ठिकाणीच दुकान लावावे, असा नियम असतानाही पिंपरीमध्ये अरुंद रस्त्यांवर दुकाने थाटली आहेत. धूम्रपान निषेधाचा फलक बंधनकारक असताना, एकाही ठिकाणी असा फलक दिसून आला नाही. सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी किमान २०० लिटर बॅरल पाण्याचा साठा, बादल्यांमध्ये वाळूचा साठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र, एकाही ठिकाणी सुरक्षेची यंत्रणा दिसून आली नाही. अग्निशामक दलातर्फे मिळणारा ‘ना हरकत दाखला’ म्हणजे फटाके विक्रीचा परवाना होत नाही. त्या व्यक्तीने संबंधित पोलीस ठाण्याचीही परवानगी घेणे बंधनकारक आहे. ज्यांनी अग्निशामक व पोलिसांची परवानगी घेतली आहे, त्यांनाच फटाके विक्रीचा अधिकार आहे. बेकायदापणे फटाके विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा अधिकार पोलिसांना असून, अशा विक्रेत्यांवर कारवाई संदर्भात मनपाचा अतिक्रमण विभाग व पोलीस यांना पत्र देणार आहोत.- किरण गावडे, अग्निशामक अधिकारी
बेकायदा फटाके विक्री
By admin | Updated: November 5, 2015 02:10 IST