मंचर : टोमॅटोचे बाजारभाव कोसळले आहेत. टोमॅटोचा २० किलोंचा एक क्रेट फक्त ९० ते १०० रुपयांना विकला जात असून, कोसळलेल्या बाजारभावाने शेतकरी संकटात सापडला आहे. आंबेगाव तालुक्यात टोमॅटोपिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मागील वर्षीपेक्षा यंदा टोमॅटो लागवडही जास्त प्रमाणात झाली आहे. सुरुवातीला टोमॅटोला बरा बाजारभाव मिळाला. २०० ते ३०० रुपये क्रेटला मिळत असल्याने थोडीफार रक्कम शिल्लक राहत होती. मध्यंतरी हा भाव ४०० रुपये क्रेटवर गेला; मात्र १५ दिवसांपासून टोमॅटोचे बाजारभाव सातत्याने कमी होत आहेत. आता तर बाजारभाव साफ कोसळले आहेत. शुक्रवारी एका क्रेटला ५० ते ८० रुपये असा बाजारभाव मिळाला. आज २० किलोंच्या एका क्रेटला १०० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. आवक वाढल्याने बाजारभाव कोसळल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. आंबेगाव तालुक्यातील टोमॅटो नारायणगाव येथे विक्रीसाठी नेले जातात. या बाजारात ८० ते ९० हजार क्रेट टोमॅटोची आवक झाल्याचे बोलले जाते. त्यातील ७० टक्के माल हा आता आंबेगाव तालुक्यातील असतो. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. इतर राज्यांत पाऊस पडत असल्यामुळे दळणवळण कोलमडले आहे. त्यामुळे येथील टोमॅटो बाहेरील राज्यात पुरेशा प्रमाणात पाठविता येत नाहीत. परिणामी, बाजारभाव कोसळले आहेत. बनावट बियाण्यांमुळे बसत असलेला फटका व आता टोमॅटोचे ढासळलेले बाजारभाव पाहता, शेतकरी संकटातून लवकर बाहेर येण्याची शक्यता नाही. बाजारभाव वाढेल, या आशेने तो माल तोडून बाजारात पाठवितो; मात्र पदरी निराशा येत आहे. टोमॅटोचा बाजारभाव वाढला नाही, तर टोमॅटो उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होईल. (वार्ताहर)
टोमॅटोचे बाजारभाव कोसळले
By admin | Updated: August 9, 2015 03:37 IST