पिंपरी : हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक्स (एचए) कंपनीच्या कामगारांना प्रलंबित १० महिन्यांपैकी ३ महिन्यांचे वेतन आणि कंपनीला ४५ कोटी रुपये वर्किंग कॅपिटल देण्याचा प्रस्ताव त्वरीत मार्गी लावण्याचे आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा दिले. मात्र, या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी भेट झाली नाही. अर्थ राज्य मंत्री जयंत सिन्हा यांची भेट कामगारांच्या शिष्टमंडळाने घेतली. दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक येथील सिन्हा यांच्या कार्यालयात गुुरुवारी सकाळी ही बैठक झाली. या वेळी केंद्रीय मंत्री अनंत कुमार, राज्य मंत्री हंसराज अहीर, खासदार श्रीरंग बारणे, एचए मजदूर संघाचे सचिव सुनील पाटसकर, अरुण बोऱ्हाडे, विजय लोखंडे, मोहम्मद पानसरे, कैलास नरुटे, राजेंद्र हंडे, राजेंद्र जाधव, ए.पी. अत्तार आदी उपस्थित होते.येथील एचए कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. गेल्या दहा महिन्यांपासून कामगारांना पगार मिळालेला नाही. एचए बचाव कृती समितीर्फे कामगारांनी १६ दिवस कंपनीच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. मोर्चा, पदयात्रा, मागणीची गुढी उभारुन, कामगार नेत्यांचे मार्गदर्शन, स्थानिक आमदार व खासदारांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने आदी प्रकारे आंदोलन झाले. आंदोलन १ एप्रिलला स्थगित करण्यात आले. आंदोलन स्थगित करुन दिल्लीत पंतप्रधान मोदी व अर्थ मंत्री जेटली यांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला. कामगारांचे शिष्टमंडळ खासदार बारणे यांच्या नेतृत्वाखाली ६ एप्रिलला दिल्लीत गेले. या शिष्टमंडळाने केंद्रिय रसायन व खत मंत्री अनंत कुमार, राज्य मंत्री हंसराज अहीर, सिन्हा, तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अनंत गीते यांची भेट घेऊन ‘एचए’च्या सध्याच्या परस्थितीबाबत चर्चा करून मार्ग काढण्याची मागणी केली.(प्रतिनिधी)
तीन महिन्यांचे वेतन देणार
By admin | Updated: April 11, 2015 05:16 IST