पिंपरी : हिंजवडी येथील फेज दोनजवळील ओझरकरवाडी येथून चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तीन महिलांचा मंगळवारीही दिवसभर कुठेही शोध लागला नाही. मोबाईल ‘स्विच आॅफ’ असल्याने निश्चित लोकेशन मिळत नसून नातेवाइकांकडे, तसेच परिसरातील नागरिकांकडे चौकशी करून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. प्रतिभा प्रकाश हजारे (वय २५, रा. ओझरकरवाडी, मूळ रा. नवलिहाळ, जि. बेळगाव), मंगला सिद्धार्थ इंगळे (वय-२६, रा. ओझरकरवाडी, मूळ रा. वाशीम), विद्या दशरथ खाडे (वय २४, रा. ओझरकरवाडी, मूळ रा. सातारा) अशी बेपत्ता झालेल्या महिलांची नावे आहेत. शुक्रवारी दुपारी दवाखान्यात जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या या महिला चार दिवसांपासून घरी परतल्याच नाहीत. हजारे व खाडे यांच्याकडे मोबाईल आहेत. मात्र, ते ‘स्विच आॅफ’ लागत आहेत. त्यामुळे त्यांचे मोबाईल लोकेशनदेखील मिळत नाही. मंगळवारी त्यांचा ठिकठिकाणी कसून शोध घेण्यात आला. नातेवाइकांसह परिसरातील नागरिकांकडेही चौकशी करण्यात आली. एकाच वेळी अचानक तीन महिला बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मंगळवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा आढावा घेत तपास अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)
‘त्या’ महिलांचा अद्यापही शोध नाही
By admin | Updated: December 2, 2014 23:49 IST