लासुर्णे : नीरा डाव्या कालव्याला पाणी सोडून महिना झाला तरी इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील वितरिकांना पाणी सोडले नाही. त्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाला आहे. संतप्त शेतकऱ्यांनी कालवा फोडण्याचा इशारा दिल्यानंतर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जाधव यांनी लासुर्णे येथे शेतकऱ्यांची भेट घेतली. या वेळी शेतकऱ्यांनी कालव्याची दारे उघडून पाणी आणणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. पाटबंधारे विभागाचे ‘टेल टू हेड’ असे पाणी वाटपाचे नियोजन असतानादेखील पाटबंधारे विभागाने काटेवाडी (ता. बारामती) येथील वितरिकेंना पाणी सोडले आहे. तसेच वितरिका क्रमांक ५९ या ठिकाणी बरेच दिवस पाणी सुरू आहे. यामुळे वितरिका क्रमांक ४३ व ४६ ला पाणी मिळण्यास उशीर होत आहे. याचा फटका येथील पिकांना बसत आहे. या वेळी गणेश फडतरे, विजय निंबाळकर, उल्हास जाचक, अरुण कदम, महादेव मोहिते, तुकाराम कुंभार, बाळासाहेब सपकळ, बाबासो वाघमोडे, शिवाजी दडस, मोहन निंबाळकर आदी शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
...तर कालव्याची दारे उघडणार
By admin | Updated: August 19, 2015 00:12 IST