राजेगाव : ‘सरल’ (डाटाबेस) योजनेअंतर्गत शाळा माहिती, शिक्षक माहिती, विद्यार्थी माहिती गोळा करून आॅनलाइन महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर भरण्याचे काम सध्या प्रत्येक शाळेमध्ये सुरू आहे. ज्या संकेतस्थळावर माहिती भरण्यास सांगितले आहे, ते संकेतस्थळ माहिती भरताना वेळोवेळी डाऊन होत असल्याने अनंत अडचणीला सामोरे जावे लागत असल्याने यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मेटाकुटीला आले आहेत. सरल या योजनेमार्फत विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्याचे काम वेगवेगळ्या यंत्रणेमार्फत (आऊटसोर्सिंग) सरकारने करावे. त्याचे ओझे शिक्षकांवर नको. शाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी शिकवणे बंदच आहे. शिक्षक, पालक आणि शाळा तिघेही हैराण आहेत. शिक्षकांना शिकवण्याचे काम करू द्या. सरल यासाठी हवे असलेले मनुष्यबळ स्वतंत्रपणे द्यावे, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे. या कामांतर्गत एकेका विद्यार्थ्यांची ८0 कॉलम माहिती भरावी लागत आहे. पालकांची आणि शिक्षकांची खासगी माहिती सरलमध्ये मागविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांवर माहिती आणण्याचे दडपण आहे. अनेक शाळांमध्ये आॅनलाइन माहिती भरण्याची पुरेशी व आवश्यक सुविधा नाही. बऱ्याच शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध नाही. ज्या ठिकाणी संगणक उपलब्ध आहेत त्या ठिकाणी विजेची सोय उपलब्ध नाही. तर काही ठिकाणी हे सर्व असूनदेखील संगणक नादुरुस्त आहे. ग्रामीण भागात अतिरिक्त प्रमाणात भारनियमन केले जात असल्याने मोबाईल मनोरे विजेच्या अभावी बंद राहत असल्याने रेंज मिळत नाही. ग्रामीण भागात नेटची रेंज फारच कमी असते. साइटवर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने साइट लोडवर आली आहे. सर्व्हर वारंवार डाऊन असतो. नेटला वेगही नीट मिळत नाही. अशातच अतिशय अपुरा कालावधी देऊन मुख्याध्यापक व शिक्षकांना वेठीस धरण्याचे काम शासन करत आहे. महाराष्ट्र शासनाकडून विभागवार माहिती भरण्याचे नियोजन केले आहे. एका विद्यार्थ्याची माहिती भरण्यासाठी रेंज मिळाली तर पाच मिनिटे लागतात. ग्रामीण भागात मात्र कोणत्याच कंपनीच्या मोबाइलला रेंज मिळत नाही. (वार्ताहर)
‘सरल’च्या माहितीने शिक्षक वैतागले
By admin | Updated: August 19, 2015 00:10 IST