सचिन कांकरिया, नारायणगावजिवंतपणी अनेक हालअपेष्टा सहन करीत येणाऱ्या संकटांना खंबीरपणे तोंड देत महाराष्ट्राची लोककला म्हणून ओळखल्या जाणा-या तमाशासाठी स्वत:ला झोकून देऊन स्वत:च्या आयुष्याचाच ‘तमाशा’करून घेणाऱ्या व अवघ्या महाराष्ट्राला आपल्या घुंगरांच्या तालावर डोलायला लावणा-या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांची मरणोत्तरही उपेक्षाच होत आाहे. नारायणगाव येथे त्यांच्या स्मरणार्थ राज्य सरकारने केलेल्या स्मारकाच्या घोषणेला आज एक तप (१२ वर्षे) पूर्ण होत आहेत. विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा आज १२ वा स्मृतिदिन आहे.१५ जानेवारी २००२ मध्ये विठाबार्इंचा नारायणगावमध्ये निवासस्थानी मृत्यू झाला. एका लोककलेचा अस्त अशा शब्दांत अनेक मंत्र्यांनी व राजकारण्यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. विठाबार्इंच्या स्मरणार्थ राज्य शासनाने १२ फेब्रुवारी २००६ ला नारायणगाव येथे पहिला तमाशा महोत्सव आयोजित केला होता़ या तमाशा महोत्सवात तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी विठाबाईंच्या स्मारकाबाबत जाहीर घोषणा केली होती; मात्र आजपर्यंत विठाबार्इंच्या स्मारकाबाबत राज्य शासनाने कोणतेही पाऊल न उचलल्याने या स्मारकाचे राज्य शासनाला विस्मरण झाले की काय....? असा प्रश्न तमाशा कलावंतांमधून व्यक्त केला जात आहे.१९३५ मध्ये विठाबार्इंचा जन्म पंढरपूर येथे झाला म्हणून त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव ‘विठाई’ असे ठेवले़ तमाशामध्ये पदार्पण केल्यानंतर रसिकांनीच विठाईचे रूपांतर विठाबाई असे केले. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी खेळणाऱ्या कोवळ्या पायात ५ किलो वजनाचे घुंगरांचे चाळ बांधून तमाशासृष्टीत विठाबाईंनी पदार्पण केले़ आयुष्यात पहिल्यांदा विठाबाईंनी वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथे रॉकेलचे टेंभे लावून झालेल्या तमाशात लावणी सादर करून रसिकांची मने जिंकली आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने विठाबार्इंच्या तमाशामय आयुष्याला सुरुवात झाली.तमाशाची कला जोपासत असताना विठाबार्इंचे स्वत:चा संसार, मुलाबाळांकडे दुर्लक्ष झाले़ पर्यायाने कुटुंबाची वाताहात झाली़ मात्र, या लोककलेवर त्यांनी निष्णात प्रेम केले. अनेक हिंदी-मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी त्यांना चित्रपटांत काम करण्यासाठी स्वत:हून अनेक आॅफर दिल्या होत्या; मात्र तमाशावर मनापासून प्रेम करणाऱ्या विठाबाईंनी केवळ तमाशासाठी चित्रपटांमध्ये काम करण्याचे नाकारले.समाजात घडणाऱ्या ताज्या घडामोडी त्यांनी तमाशाच्या मंचावरून अत्यंत प्रभावी व सहजपणे मांडून विविध विषयांद्वारे त्यांनी समाजप्रबोधन केले. १९६२ च्या भारत-चीन युद्धादरम्यान विठाबार्इंनी नेफा आघाडीवर जाऊन जवानांचे मनोरंजन केले होते. १९९० मध्ये तत्कालीन राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांच्या हस्ते विठाबाईंना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले होते.विठाबाईंचे स्मारक हे तमाशाक्षेत्रातील इतर कलावंतांसाठी प्रेरणास्रोत ठरणार आहे़ मात्र, विठाबार्इंसारख्या एका महान कलावंताचं हे स्मारक १२ वर्षे पूर्ण होऊनही होत नसेल, तर आपल्यासारख्याची काय गत....? हा प्रश्न निश्चितच इतर कलावंतांना भेडसावणारा आहे.
तमाशा सम्राज्ञी विठाबार्इंच्या स्मारकाचे शासनाला विस्मरण!
By admin | Updated: January 15, 2015 00:01 IST