उन्हाचे चटके कमी होऊन पावसाची बरसात झाली की वातावरणात शीतलता येते. शरीरालाही पावसाळा सुखद वाटतो. मात्र, पावसाळा जितका रम्य, तितका अनेक आजारांना आमंत्रण देणाराही ठरतो. वातावरणातील आर्द्रता, ओलसरपणा यामुळे डोक्याच्या केसापासून त्वचेपर्यंत अनेक तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तब्येत सांभाळणे अत्यंत आवश्यक असते. पावसात भिजल्यामुळे सर्दी, खोकला, ताप इथपासून त्वचेला होणारे इन्फेक्शन, केसांमध्ये कोंडा होणे, विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव यांची शक्यता वाढते.
पावसाळ्यात पाणीपुरी, भेळ, वडापाव असे पदार्थ खाल्ल्याने पोट बिघडते, उलट्या होतात. त्यामुळे या दिवसांमध्ये उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळावे. दूषित पाण्यामधूनही अनेक आजार पसरतात. त्यामुळे ताजे आणि उकळलेले पाणी प्यावे. पावसात भिजल्याने त्वचा खूप काळ ओली राहते. त्यामुळे पुरळ येणे, त्वचेला खाज सुटणे, केस चिकट होणे, केस गळणे असेही त्रास होतात. त्यामुळे पावसातून आल्यावर त्वचा आणि केस कोरडे करणे, अँटिफंगल पावडर वापरणे आवश्यक असते.
पावसाळ्यात विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती उत्तम राखणे आवश्यक असते. त्यामुळे आहार आणि व्यायामाची पथ्ये पाळण्याचा सल्ला तज्ज्ञांकडू दिला जातो. या हंगामात तेलकट, मसालेदार पदार्थ टाळावेत. हिरव्या पालेभाज्या, सॅलड यांचा समावेश करावा. दररोज सकाळी अर्धा तास व्यायाम करावा. पावसामुळे घराबाहेर पडणे शक्य नसल्यास घरच्या घरी योगासने करावीत.