वडगाव मावळ : मावळ तालुक्यामध्ये इनरकॉन कंपनीने डोंगरावर उभारलेल्या पवनचक्क्यांमुळे डोंगर पायथ्याशी असलेल्या गावांना संभाव्य होणाऱ्या धोक्याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने नायब तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यामध्ये इनरकॉन कंपनीच्या माध्यमातून डोंगरावर व डोंगरउतारावर मोठ्या प्रमाणात पवनचक्क्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्या वेळेस टेकड्यांचे व डोंगराचे फार मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले होते. त्यामुळे डोंगरकडा ढासळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याडोंगरउतारावरील साई, वाऊंड, कचरेवाडी, घोणशेत, माऊ व कल्हाट या गावांना धोका निर्माण झाला असून, माळीण गावासारखी दुर्घटना भविष्यात होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात इनरकॉन कंपनीने उपाययोजना केल्या आहेत का? या संदर्भातील माहिती घ्यावी, तसेच शासनाच्या काही उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात अशी जी जी गावे आहेत, त्यांचे सर्वेक्षण करून योग्य ती खबरदारी घेण्याचे ठरविलेले आहे व वरील गावांचे सर्वेक्षणसुद्धा शासनामार्फत करण्यात येऊन सुरक्षेची पूर्तता करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर पंचायत समिती सभापती राजाराम शिंदे, भाजपचे संघटनमंत्री अविनाश बवरे, सरचिटणीस यदुनाथ चोरघे, प्रकाश देशमुख आदींची स्वाक्षरी आहेत. (वार्ताहर)
संभाव्य धोक्याबाबत उपाययोजना करा
By admin | Updated: August 4, 2014 04:31 IST