मांडवगण फराटा : सासू, नवरा, दीर गेल्या सहा महिन्यांपासून सतत त्रास देत असल्याने ते सहन न झाल्याने वडगाव रासाई, शेलारवाडी (ता. शिरूर) येथील जयश्री संदीप ढमढेरे या २७ वर्षीय विवाहितेने आपल्या वडिलांच्या राहत्या घरी अंगावर रॉकेल ओतून स्वत: पेटवून घेतले. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. १५) दुपारी ४.१५ च्यादरम्यान घडली. नवरा संदीप नारायण ढमढेरे, सासू छबूबाई नारायण ढमढेरे, दीर सचिन नारायण ढमढेरे (सर्व रा. राहू, ता. दौंड, जि. पुणे) या तिघांच्या विरोधात जयश्रीचे वडील श्यामराव अप्पासाहेब शेलार यांनी मांडवगण फराटा पोलीस औटपोस्टमध्ये फिर्याद दाखल केली आहे. शिरूर पोलिसांनी शनिवारी (दि. १५) गुन्हा दाखल केला आहे. तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे. मांडवगण फराटा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : सात वर्षांपूर्वी जयश्री संदीप ढमढेरे हिचा संदीप नारायण ढमढेरे याच्याशी विवाह झाला होता. त्यांना मुलगा असून, गेले साडेसहा वर्षे सुरळीत चालू होते. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या जयश्रीच्या भावाच्या लग्नात जयश्रीचा पती, सासू व दीर योग्य मानपान न मिळाल्याचा, पती, सासू व दीर तुझ्या भावाच्या लग्नामध्ये आम्हाला योग्य मानपान दिला नाही, या कारणावरून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात असे. याबाबत जयश्रीच्या घरी अनेक वेळा बैठका घेऊन समजुती घातल्या होत्या. परंतु, गुरुवारी (दि. १३) जयश्रीचा पती संदीप तिला वडगाव रासाई येथे आणून सोडून निघून गेला. त्या वेळी सर्व हकिगत जयश्रीने आपल्या वडिलांना सांगितली. त्या वेळी वडिलांनी तिची समजूत काढली व होईल सर्व ठीक. आपल्या मुलाकडे लक्ष दे, असे सांगत तिची समजूत काढली होती; परंतु पती संदीप फोनवरून शिवीगाळ करून दमदाटी करीतच होता. त्या जाचाला कंटाळून जयश्रीने कुणालाही काहीही न सांगता आपल्या वडिलांच्या घरातील रॉकेल स्वत: अंगावर ओतून घेऊन पेटवून घेतले. या घटनेत पती, सासू व दीर यांचा समावेश असल्याचे शेलार यांनी पोलिसांना सांगितले. (वार्ताहर)
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची पेटवून घेऊन आत्महत्या
By admin | Updated: August 17, 2015 02:51 IST