पिंपरी : स्थायी समितीतील दोन सदस्यांमध्ये सुरू झालेल्या चेष्टामस्करीचे रूपांतर वादंगात झाले. त्यांच्यात शाब्दिक खडाजंगी झालीच; शिवाय एकमेकांवर खुर्च्या उगारण्यापर्यंत त्यांनी मजल मारली. या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला सदस्यांनी तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केली. या प्रकाराची वाच्यता होणार नाही, याची दक्षता घेतली गेली. तरीही घडला प्रकार चव्हाट्यावर आला. याची चर्चा मात्र महापालिका वर्तुळात चांगलीच रंगली.टक्केवारीमुळे स्थायी समितीचा कारभार चव्हाट्यावर आला असून, त्याविषयी शहरभर चर्चा आहे. बाहेरच्या लोकांमध्ये स्थायी समितीतील कारभाराची चर्चा होत असताना, गुरुवारी सायंकाळी ५च्या सुमारास टक्केवारीच्या मुद्द्यावरच सदस्यांमध्ये चर्चा सुरू होती. अध्यक्ष महेश लांडगे यांच्या अनुपस्थितीतस्थायी समिती कक्षात बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शांताराम भालेकर आणि अपक्ष नगरसेवक प्रसाद शेट्टी यांच्यात याच मुद्द्यावरून चेष्टामस्करी सुरू झाली. भालेकर यांनी गमतीने शेट्टी यांना अधिक पैसे मिळाले असावेत, असा अंदाज व्यक्त केला. शेट्टी यांना ही मस्करी सहन झाली नाही. त्यांनी भालेकर यांच्या वक्तव्याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. चेष्टेचे रूपांतर भांडणात झाले. त्यांनी एकमेकांच्या अंगावर खुर्च्या उगारल्या. हा प्रकार पाहणाऱ्या महिला सदस्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी जुमानले नाही. दरम्यान, मनपा कर्मचाऱ्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष लांडगे यांना याबाबत माहिती दिली. ते तातडीने समितीच्या कक्षात पोहोचले. ते आल्यानंतरही वादंग सुरूच होते. थोड्या वेळाने ते थांबले आणि काही घडलेच नाही, अशा आविर्भावात सर्वजण निघून गेले.(प्रतिनिधी)
चेष्टामस्करीचे रूपांतर वादंगात
By admin | Updated: September 12, 2014 03:35 IST