पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खुनाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतरही अद्याप त्यांच्या मारेकऱ्यांचा छडा लागलेला नाही; मात्र या दोन वर्षांच्या काळात डॉक्टरांच्या विवेकवादी विचारांचा जागर राज्यभर उभा राहिला आहे. अंनिसकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांचा ओघ मोठ्याप्रमाणात वाढला असून, अंनिसच्या राज्यभरातील शाखांच्या संख्येने तीनशेचा टप्पा ओलांडला आहे. ओकांरेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर २० आॅगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर पाठीमागून येऊन गोळ्या झाडून खून करण्यात आला. लोकांमधील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी, त्यांचे होत असलेले शोषण थांबविण्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या डॉक्टर दाभोलकरांच्या खुनाचा देशभरातून तीव्र निषेध करण्यात आला. दाभोलकरांच्या खुनाचा छडा लावून त्यांच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी याकरिता पुरोगामी संस्था, संघटनांकडून गेल्या दोन वर्षांपासून आवाज उठविला जात आहे. त्यांच्या खुन्यांना पोलिसांनी अटक करावी, तपास योग्य दिशेने व्हावा, यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच दाभोलकरांचे विवेकवादी विचार देशभर पोहोचविण्याचा चंग अंनिसच्या कार्यकर्त्यांनी बांधला. त्यातून राज्यभर प्रबोधनचा विचार पोहोचविण्यात अंनिसला मोठे यश मिळाले आहे.अंधश्रद्धेतून होणारे लोकांचे शोषण थांबण्यासाठी त्याला कायद्याचा आधार मिळावा, याकरिता राज्य शासनाने जादूटोणाविरोधी कायदा करावा. यासाठी डॉक्टर दाभोलकर यांनी १८ वर्षे सातत्याने प्रयत्न केले. मात्र, यामुळे लोकांच्या भावना दुखावतील की काय, या भीतीपोटी पुरोगामी महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी हा कायदा मंजूर केला नव्हता. डॉक्टरांच्या निर्घृण खुनानंतर राज्यकर्त्यांना अखेर जाग आली आणि त्यांनी अध्यादेश काढून हा कायदा मंजूर केला. याबाबत अंनिसचे राज्याचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी सांगितले, की जादूटोणाविरोधी कायदा मंजूर होणे हा अंनिसच्या चळवळीला मिळालेले मोठे यश आहे. गेल्या दोन वर्षांत या कायद्यांतर्गत १०७ गुन्हे दाखल झाले आहेत. या कायद्याविषयी जाणीवपूर्वक पसरविले जाणारे गैरसमज चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. जातपंचायतीच्या चुकीच्या प्रथांना लगाम लावण्यातही चळवळीला मोठे यश मिळाले आहे. तरुण-तरुणी मोठ्या संख्येने अंनिसच्या कामामध्ये सहभागी होत आहेत. अंनिसच्या कार्यकर्त्यांचे १७ गट तयार करून रिंगणनाट्य बसविण्यात आले आहेत. या १७ गटांनी वर्षभरात ३६५ प्रयोग करून गावागावांमध्ये अंधश्रद्धेविरोधात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर जादूचे प्रयोग दाखवून त्यामागची वैज्ञानिक कारणे स्पष्ट करून जागृती केली जात आहे.
विवेकाचा आवाज बुलंद करा
By admin | Updated: August 20, 2015 02:27 IST