कुरकुंभ : स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथे पुणो-सोलापूर महामार्गावर वाळूमाफियांच्या विरोधात ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्र घेतला.
स्वामीचिंचोली परिसरात वेळोवेळी पाणीटंचाई भासते. त्यानुसार लाखो रुपये खर्च करून या भागात पाणी अडविण्याचे काम झाले आहे. या पाण्यात मोठय़ा प्रमाणावर वाळू साचल्याने माफिया रात्रदिवस वाळूउपसा करीत आहेत. परिणामी, ग्रामस्थांना दमबाजीदेखील केली जात असे. याकडे शासनाचे दुर्लक्ष होते. त्यामुळे या माफियांना जरब बसविण्यासाठी रास्ता रोखो आंदोलन करण्यात आले.
तहसीलदार उत्तम दिघे यांना निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या भागातील मंडल अधिकारी, तलाठी आणि पोलीस यांचे निलंबन करण्यात यावे, तसेच स्वामीचिंचोली परिसरात कायमस्वरूपी वाळूउपसा बंद करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या वेळी कांतीलाल ननवरे, नवनाथ शिंदे, सीताराम ननवरे, बापूसाहेब कुटे, ज्योतीराम मोरे, रामचंद्र शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक सजन हंकारे, अतुल भोसले, धनाजी येवले आणि त्यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)