लोणी काळभोर : ‘‘स्वातंत्र्यानंतर १९७२ पासून २०१६ पर्यंतचा दुष्काळ अनुभवत असताना, शेतकऱ्यांची मुले सत्तेत जाऊनदेखील शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात म्हणूनच शेतकऱ्यांचा विकास थांबला. राज्यात विकास करताना राजकीय नैतिकतेचा दुष्काळ पडला आहे. याचे चित्रण मराठी साहित्यातील कथा, कादंबरी, कविता, ग्रामीण साहित्यातून आले असून, शेतकऱ्यांच्या प्रश्न तसेच त्यांच्या समस्यांना वाचा फोडणारे महात्मा फुले आद्य क्रांतिकारक होते,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय लोणी काळभोर येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत ‘दुष्काळाचे मराठी साहित्यातील प्रतिबिंब’ या विषयांवर दोनदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोतापल्ले बोलत होते. या राज्यस्तरीय चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे प्रशासन सहसचिव डॉ. अशोक करांडे होते. प्रास्ताविकात प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख यांनी चर्चासत्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी, दुष्काळावर मात करून त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तर समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी विषयप्रवर्तक डॉ. सुहास पुजारी (सोलापूर), डॉ. विद्यासागर पाटंगणकर (बीड), डॉ. शिरीष लांडगे पाटील (नेवासा), डॉ. जयद्रथ जाधव (रेणापूर, लातूर), डॉ. उदय जाधव (खटाव, सातारा), इत्यादींनी संशोधनपर लेखांचे वाचन केले. यावर्षीचे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी वीर राठोड (औरंगाबाद), यांच्यासमवेत डॉ. महादेव वाळुंज (इंदापूर), डॉ. किसन माने (सांगोला), प्रा. अरविंद हंगरेकर (तुळजापूर), ज्ञानेश्वरी मुंडे (औरंगाबाद), डॉ. रामलीला पवार (जालना), डॉ. तानाजी देशमुख (सोलापूर), प्रा. भाऊ गोसावी (कोल्हापूर), डॉ. अशोक तवर (पाचगणी), कु. मयूरा जाधव (सोलापूर), प्रा. रत्नाकर बेडगे (लातूर), प्रा. शिवाजी गायकवाड (लोणी काळभोर), प्रा. समीर आबनावे (उरुळी कांचन) आदींनी शोधनिबंधाचे वाचन केले. प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील (कोल्हापूर), डॉ. अविनाश सांगोलेकर (मराठी विभाग प्रमुख-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), डॉ. शिरीष पाटील (जळगाव), प्राचार्र्या शोभा इंगवले (पुणे), डॉ. नानासाहेब सूर्यवंशी (नांदेड), डॉ. स्नेहल तावरे, इत्यादींनी विविध सत्रांचे अध्यक्ष म्हणून भूमिका पार पाडली. सूत्रसंचालन डॉ. संभाजी निकम व प्रा. स्नेहा बुरगुल यांनी केले.
राज्यात राजकीय नैतिकतेचा दुष्काळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2016 01:02 IST